सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, बदल्यांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय..!
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.. गेल्या 2 वर्षांपासून देशासह महाराष्ट्रात कोरोनाचे संकट होते. त्यामुळे सारे काही ठप्प झाले होते. त्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्याही रखडल्या होत्या. मात्र, आता या बदल्यांबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे..
कोरोनामुळे गेल्या 2 वर्षांपासून रखडलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या यंदा होणार आहे. सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवरील निर्बंध राज्य सरकारने उठवले आहेत. अधिनियमानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची कार्यवाही करण्याची आदेश सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहेत..
शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या पदानुसार व कार्यकालानुसार दर 3 वर्षांनी बदल्या होतात.. दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची धांदल उडालेली असते. तथापि, 2020 व 2021 मध्ये कोरोनाचा कहर सुरु होता. त्यामुळे राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या न करण्याबाबतचा आदेश दिला होता.
कर्मचाऱ्यांना दिलासा…
गेल्या काही दिवसांत कोरोना संसर्ग बऱ्यापैकी कमी झाला आहे. राज्य सरकारने सगळे कोविड नियम शिथील केले आहेत. जनजीवन पूर्वपदावर आले आहे. त्यामुळे राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या बदल्यांवरील निर्बंधही मागे घेतले असून, कर्मचाऱ्यांच्या नियमित, सर्वसाधारण बदल्यांचा मार्ग मोकळा झालाय.
एकाच पद्धतीचे काम करून सरकारी कर्मचारी कंटाळले होते. त्यातही दुर्गम भागात सेवा बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांना, विशेषत: महिलांची गैरसोय होते. या सगळ्या कर्मचाऱ्यांना बदलीचे वेध लागले होते. बदल्यांवरील निर्बंध हटल्याने या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांच्या गट ‘क’मध्ये वेगवेगळे संवर्ग आहेत. सामान्य प्रशासन विभागाने लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भातील अभ्यास समितीच्या शिफारशीनुसार, गट ‘क’मधील पदोन्नतीचे स्तर कमी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे काही संवर्ग कमी होणार असून, गट ‘क’ कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीच्या संधी वाढणार आहेत.


0 Comments