बीडचा 'बिहार' होतोय... - बाईमाणूस
सुकेशनी नाईकवाडे
दिल्लीमध्ये आपला प्रतिनिधी म्हणून प्रितम मुंडे यांच्या रूपाने एक महिला प्रतिनिधी पाठविणाऱ्या बीड जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. मागील एका आठवड्यात दोन सामुहिक बलात्काराची प्रकरणे उघडकीस आली. राजकीय नेत्यांचा विचार केला तर प्रत्येक नेता या विषयावर आपले मत मांडतो आहे, अनेक मागण्या करतो आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे सामाजिक ‘न्याय’मंत्री असणाऱ्या धनंजय मुंडे यांच्याच जिल्ह्यात महिलांवर राजरोसपणे ‘अन्याय’ होतो आहे असे एकूण चित्र पहायला मिळतं आहे. राज्यभरातील वर्तमानपत्रे आणि टिव्हीवर बीडच्या महिलांवरील अत्याचारांचे मथळे रोज झळकत आहेत. या सगळ्या घटनांचा आणि एकूणच बीड जिल्ह्यातील या गढूळ वातावरणाचा या जिल्ह्यात राहणाऱ्या नागरिकांच्या मनावर दूरगामी परिणाम होणार यात शंकाच नाही.
प्रमुख राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया
खरंतर एखादी अशी अप्रिय घटना घडली की प्रत्येक राजकीय नेता आपापल्या परीने दुःख करत असतो. मागण्या करत असतो, आंदोलने करत असतो उदाहरणच जर घ्यायचे झाले तर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी या विषयावर नेहमीच आवाज उठवण्याचे काम केले आहे आणि अशा घटनांना आळा बसविण्यासाठी राज्य सरकारच्या गृह खात्याने योग्य ती पाऊले उचलावीत या आशयाचे पत्र त्यांनी काही महिन्यापूर्वी राज्याचे गृहमंत्री आणि पोलिस महानिरीक्षकांना दिले होते. यामध्ये त्यांनी बीड जिल्ह्यात गुन्हेगारांनी हैदोस मांडला असल्याचे म्हटले होते. बीड जिल्ह्यात गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना मोठया प्रमाणात वाढल्या असल्याचेही त्या म्हणाल्या तर चोऱ्या, खून, मारामाऱ्या, महिलांवर अत्याचार, खंडणी वसुली, तलवारी, रिव्हॉल्व्हर अशा घातक शस्त्रास्त्रांचा वापर सर्रास होताना दिसून येत असल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले होते.
बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या वाढत्या घटना अतिशय चिंताजनक बाब बनली आहेत, अशा घटना गंभीरतेने घेण्याची गरज निर्माण झाली असून केवळ बीडच्या कायदा-सुव्यवस्था विषयावर स्वतंत्र व विशेष बैठक घेऊन गुन्हेगारांच्या विरोधात कठोर पावले उचलावीत आणि परिस्थिती नियंत्रणात आणून सर्व सामान्य नागरिकांच्या मनातील भिती दूर करावी अशी मागणी देखील पंकजा मुंडे यांनी पत्राद्वारे केली होती.
धनंजय मुंडेंना पक्षातील स्वकीयांकडून घरचा आहेर
याच मुद्यावर राष्ट्रवादीचे काँग्रेसचे बीड येथील आमदार संदीप क्षीरसागर तसेच माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी मांडून बीड जिल्ह्याचा ‘बिहार’ केला असल्याचा आरोपही यावेळी आमदार प्रकाश सोळंके यांनी केला होता तर पालकमंत्र्यांना वारंवार सांगूनही हा विषय ते गांभीर्याने घेत नसल्याचेही बीड मतदार संघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी लक्षवेधीमध्ये म्हटले होते.
तर पंकजा मुंडे यांनी केलेल्या आरोपांवर मोहर लावण्याचे काम त्यांच्याच पक्षातील दोन आमदारांनी केल्याने पालकमंत्री धनंजय मुंडे यांना घरचा आहेर मिळाला होता . याच अधिवेशनात भाजपच्या केज मतदार संघातील आमदार नमिता मुंदडा यांनीही लक्षवेधी मांडत म्हटले होते की, “बीड जिल्ह्यात महिला आमदारच सुरक्षित नाहीत तर सामान्य महिलांचे काय होत असेल? महिला आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात साधी तक्रार सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन देऊ शकत नाहीत .जिल्ह्यात महिलांवर बलात्काराचे प्रमाण खूप वाढले आहे. बीड जिल्ह्याची परिस्थिती एवढी बिकट झाली असून पोलीस स्टेशनमध्ये सर्व सामान्य माणूस जाऊच शकत नाही खूपच हिम्मत करून जर कोणी गेलाच तर पोलीस प्रशासन मात्र तक्रार दाखल करण्यास चल ढकल करत आहे.”
तर दुसरीकडे शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष तथा विधान परिषदेचे आमदार विनायक मेटे यांनी बीड मध्ये काही महिन्यांपूर्वी पत्रकार परिषद आयोजित करून बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णतः ढासळली असून पोलिसांचा कसलाही धाक गुन्हेगारांवर उरला नसल्याचे ते म्हणाले. दिवसा ढवळ्या चोऱ्या, खून, मारामाऱ्या, महिलांवर अत्याचार अशा घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. या घटनांमुळे सर्व सामान्य नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असून याची गंभीर दखल घेतली गेली पाहिजे असे विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलतांना म्हणले होते
राज्याच्या गृहमंत्र्यांसोबत मी चारवेळा पात्रव्यवहार केला असल्याचा खुलासा यावेळी त्यांनी केला तर मेटे यांनी बीड जिल्ह्यातील क्षीरसागर कुटुंब आणि पालक मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली होती.
गुंडांचा चक्क जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गोळीबार
बीड जिल्ह्यामध्ये कायदा-सुव्यवस्थेचे पूर्णपणे तीन तेरा वाजलेले असून बीड शहरामध्ये उघडपणे निर्ढावलेल्या आणि सरावलेल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून चक्क जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गोळीबार करत उच्छाद मांडला गेला. गुन्हे दाखल होऊनही त्यांना अटक केली जात नाही म्हणून स्वतः मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावे अशी मागणी आमदार विनायक मेटे यांनी केली होती त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला त्यासाठी राज्याच्या गृहमंत्र्यांनीएकदा बीडला भेट द्यावी अशी मागणी देखील मेटे यांनी केली होती.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झालेल्या गोळीबारानंतर निर्माण झालेला तणाव
बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी देखील बीडमधल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. बीड जिल्ह्यात गेल्या अनेक महिन्यापासून कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. खून, दरोडे, बलात्कार आणि हाणामाऱ्यामुळे बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप खासदार प्रीतम मुंडे यांनी केला आहे.
बीड जिल्ह्यात ग्रामीण भाग असो अथवा शहरी भाग सद्यस्थितीला महिला व मुली कुठेच सुरक्षित दिसून येत नाहीत. शाळा, महाविद्यालय,रस्ते, शेत, सार्वजनिक ठिकाण असो अथवा स्वतःचे घर या सर्व ठिकाणी महिला सवतः ला असुरक्षित समजत आहेत. काही महिन्यापूर्वीच आंबाजोगाईमध्ये एका अल्पवयीन मुलीवर जवळपास 500 वेळा बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आणि जिल्हा अक्षरशः हादरून गेला आणि याच पाठोपाठ अक्षरशः बलात्काराची मालिकाच जणू सुरू झाली. वासनेने बरबटलेल्या नराधमांना लहान मूल कळेना की विवाहित महिला चक्क गॅंग रेप च्या घटना समोर आल्याने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था जिल्ह्यात आहे का? असा प्रश्न सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
जिल्ह्याचा ‘बिहार’ झाला असे आमदार प्रकाश सोळंके यांनी म्हटले होते ते चुकीचे होते का ?
खरंतर बिहार या राज्याचे नाव बदनाम करण्याचा कुठलाही हेतू नाही पण ‘बिहार’ ची ओळख एकेकाळी गुन्हेगारीचे राज्य अशी होती आणि दुर्दैवाने पुरोगामी महाराष्ट्राचा एक जिल्हा बीड सुद्धा ‘बिहार’ होण्याच्या मार्गावर वेगाने पाऊले उचलताना दिसतोय.लग्न समारंभात फटाके वाजवण्याऐवजी चक्क बंदुकीच्या गोळ्या झाडल्या जातात, वाढदिवसाला चक्क तलवारीने केक कापले जातात. खुले आम तलवारीने सपासप वर करून दिवसा ढवळ्या खून केला जातो, विनापरवाना शस्त्र बाळगले जातात अपहरणे केली जातात, याचबरोबर राजरोसपणे अवैध धंद्यांनी जिल्हा त्रस्त होऊन गेला आहे.
सामान्य माणूस या घटनांच्या विरोधात साधी तक्रार सुद्धा देऊ शकत नाही जर कोणी एखादा धाडस करून पोलीस स्टेशनाची पायरी चढलाच तर त्याच्यावरच अनेक खोटे गुन्हे दाखल केले जातात.एकंदर राजकीय दबावापोटी पोलीस प्रशासनाचे हात बांधल्याचे चित्र समोर येत आहे.
२०१४ पासून वाढते आहे बलात्काराचे प्रमाण
इसवीसन 2014 मध्ये बलात्काराच्या 70 केसेस दाखल झाल्या तर 2015 मध्ये हा आकडा 78 वर जाऊन पोहोचला. 2016 मध्ये 57, 2017 मध्ये 66, 2018 मध्ये 89 आणि मागील तीन वर्षात तर महिलांवरील बलात्काराच्या प्रकरणांचा आकडा हा शंभरीच्या खाली येतच नाहीये कारण 2019 मध्ये बीड मध्ये 106 महिलांचे बलात्कार करण्यात आले, 2020 मध्ये 119 तर 2021 मध्ये तब्बल 144 महिलांना बलात्काराला सामोरे जावे लागले. हे सगळे आकडे वाचताना खचितच कुणाला काही होत असेल पण बीडमध्ये दरवर्षी सरासरी शंभर कुटुंबे उध्वस्त होत आहेत. हे सगळं होत असतांना जिल्ह्यातील अवैध धंदे, राजकारण, दुष्काळ, खून , मारामाऱ्या या गोष्टी जिल्ह्यातील नागरिकांना सवयीच्याच होऊन गेल्यात.
बीड मध्ये घडणाऱ्या बलात्कारांच्या गुन्ह्यात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्काराचे प्रमाण धक्कादायक आहे.
आपण इथे पोलीस ठाण्यात नोंदविल्या गेलेल्या गुन्ह्यांबद्दल बोलतोय पण ज्या घटनांची कुठेच नोंद होत नाही अथवा धमकावून ज्या घटना दाबण्याचा प्रयत्न केला जातो. अशा बलात्कार आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण खूप जास्त आहे. बीडचा बिहार होण्यास नेमके जबाबदार कोण? डोळेझाक करणारे, मोठमोठ्या मिरवणुका घेणारे, गुंडांना पोसणारे राजकीय नेते की झोपेचं सोंग घेऊन निपचित पडलेलं पोलीस प्रशासन? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न बीड मध्ये राहणारा प्रत्येक जबाबदार माणूस करतोय.
0 Comments