आटपाडी ग्रामपंचायतीचे रुपांतर नगर पंचायतीत, ‘मॉडेल सिटी’ म्हणून विकसित करण्याची घोषणा
आटपाडी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत करणार असून, हे शहर महाराष्ट्रात मॉडेल सिटी म्हणून विकसित करणार असल्याची घोषणा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आटपाडीतील शेतकरी मेळाव्यात केली.
सांगली जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा आणि शिवसेनेच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात मंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. या वेळी गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई, खासदार धैर्यशील माने, आमदार अनिल बाबर, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील, शिवसेनेचे उपनेते, सांगली-सातारा जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे-पाटील, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते, तालुकाप्रमुख साहेबराव पाटील आदी उपस्थित होते.
मंत्री शिंदे म्हणाले, ‘आटपाडी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत करून शहराच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही. ही नगरपंचायत रोल मॉडेल करू अशी ग्वाही दिली. या वेळी डाळिंब पिकावर आलेल्या पिन होल बोर रोगावर कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्यासोबत उपाययोजनेबाबत बैठक घेण्याचे आणि दुष्काळी तालुक्यांसाठी वैधानिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत शासनस्तरावर विचार केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
आमदार बाबर यांनी कामाचे श्रेय घेणाऱ्यांना फटकारत माझे काम जनतेला माहीत असल्याचे सांगितले. आटपाडी तालुक्यात दुष्काळ आणि टँकरच्या पाण्यावर मोठय़ा कष्टाने आलेल्या डाळिंब बागा पिन होल रोगाने उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यावर उपाययोजना केल्यास आटपाडीचा कॅलिफोर्निया होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई म्हणाले, ‘पाणी योजनांच्या वीजबिलाचा प्रश्न आमदार बाबर यांनी 81-19 फॉर्म्युला वापरून सोडवला. टेंभू सहाव्या टप्प्याची पोस्टर कोणीही लावली तरी हे काम आमदार अनिल बाबर यांनीच केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.’
0 Comments