सोलापूर - पुणे महामार्गावर ट्रकने दुचाकीला उडवले !
मोहोळ : सोलापूर - पुणे महामार्गावर मोहोळजवळ झालेल्या एका अपघातात एक तरुण जागीच ठार झला तर एक जण जखमी झाला आहे.
मोहोळच्या परिसरात अलीकडे अपघाताचे प्रमाण वाढू लागले असून दुचाकीचे अनेक अपघात गेल्या काही काळात झाले आहेत. आज पुन्हा याच मार्गावर एका दुचाकीला पाठीमागून एका मालट्रकने उडविल्याने २४ वर्षाच्या एका तरुणाचा जागीच मृत्यू होण्याची घटना घडली.
सोलापूर- पुणे महामार्गावर मोहोळ जवळ कन्या प्रशाला चौकात हा अपघात घडला आणि या अपघातात सागर विश्वनाथ चव्हाण (वय २४, रा. शावळ तांडा ) याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा सहकारी सचिन सहदेव चव्हाण हा २५ वर्षे वयाचा तरुण जखमी झाला आहे. सदर दोन्ही तरुण दुचाकीवरून सोलापूरच्या दिशेने निघालेले असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या एका मालट्रकने त्यांना जोराची धडक दिली आणि हा अपघात झाला आहे.
सदर अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अक्कलकोट तालुक्यातील शावळ तांडा येथील सागर विश्वनाथ चव्हाण आणि सचिन सहदेव चव्हाण हे दोघेही पुण्यात एका कंपनीत नोकरी करतात. सागर चव्हाण याच्या घरी वास्तुशांतीचा कार्यक्रम असल्यामुळे हे दोघेही मोटार सायकलवरून ( एम एच १२ एस झेड ६२२०) आपल्या गावी निघालेले होते.
त्यांची दुचाकी मोहोळ येथील कन्या प्रशालेच्या चौकात आली असताना त्यांच्या पाठीमागून आलेल्या एका मालट्रकने (एम एच २४ ए यु ५२०२) जोराची धडक दिली त्यामुळे सदर दुचाकी समोरच्या रस्ता दुभाजकावर जाऊन आपटली. यात सागर चव्हाण यांच्या डोक्यात, हाताला जोरदार मार लागला, त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्या पाठीमागे बसलेल्या सचिन चव्हाण यालाही जोरदार मार लागून तो जखमी झाला. त्याला मोहोळ येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूर येथे पाठविण्यात आले.
सदर अपघात प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अविचाराने, निष्काळजीपणे भरधाव वेगात वाहन चालवून दुचाकीला धडक देवून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


0 Comments