google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पंढरपूर तालुक्यात पुतण्यानेच फोडले चुलत्याचे घर ! पोलिसांनी लावला छडा !!

Breaking News

पंढरपूर तालुक्यात पुतण्यानेच फोडले चुलत्याचे घर ! पोलिसांनी लावला छडा !!

 पंढरपूर तालुक्यात पुतण्यानेच फोडले चुलत्याचे घर ! पोलिसांनी लावला छडा !!

पंढरपूर : पुतण्यानेच चुलत्याचे घर फोडले असल्याची घटना पंढरपूर तालुक्यात उघडकीस आली असून पोलिसांनी अत्यंत कौशल्याने आणि वेगाने   या चोरीचा छडा लावला आहे.  


पंढरपूर तालुक्यातील मठवस्ती (कासेगाव) येथे अज्ञात आरोपींनी शेख यांचे घर फोडून जवळपास पावणे दोन लाख रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार पंढरपूर पोलिसांकडे गेली. शमा सलीम शेख आणि त्यांच्या भाऊ पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेले असता त्यांच्या घरात चोरी झाली असल्याची माहिती त्यांना मिळाली. १ लाख ७२ हजार रुपये रोख आणि दागिने अशी चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तातडीने पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली. कासेगाव परिसरात देखील या चोरीची चर्चा सुरु झाली. 


अलीकडे सगळीकडेच चोरीच्या घटना वाढलेल्या असल्यामुळे कुणी सराईत चोरट्यांनी ही घरफोडी केली असावी असे वाटत राहिले. पंढरपूर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल करून सदर घटनेचा तपास सुरु केला. चोरी झालेल्या घराच्या आजूबाजूलाही पोलिसांनी चौकशी करून काही माहिती  मिळविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी चौकशी केली असता त्यांना ही चोरी जवळच्याच व्यक्तीने केल्याचा अंदाज आला. पोलिसांनी फिर्यादीच्या भावाचा मुलगा सादिक मुबारक शेख (मठ वस्ती, कासेगाव) याला विश्वासात घेत त्याच्याकडे तपास सुरु केला. 


पोलिसांच्या संशयाची सुई फिर्यादीच्या पुतण्याकडे गेली होती त्यामुळे पोलिसांनी आपल्या पद्धतीने तपासाला सुरुवात केली. अखेर सादिक शेख याने ही चोरी आपणच केली असल्याची कबुली पोलिसांकडे दिली.   सादिक आणि त्याचा कासेगाव येथील भीमनगरमध्ये राहणारा मित्र आकाश प्रकाश जाधव यांनी मिळून फिर्यादीचे घर फोडून १ लाख ७२ हजार रुपये रोख आणि ११ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले असल्याचे स्पष्ट झाले. 


चोरीला माल हस्तगत 

चोरीच्या प्रकरणाचा वेगाने छडा लागताच पोलिसांनी दोघांना अटक केली आणि त्यांच्याकडून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल देखील लगेच हस्तगत केला. तातडीने आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्यामुळे चोरलेली संपूर्ण रक्कम आणि दागिने आरोपीकडून पोलिसांनी मिळवले. 


उपचारासाठी ठेवेलेले पैसे 

कँसरने आजारी असलेल्या आईच्या उपचारासाठी घरात एवढी मोठी रक्कम ठेवलेली होती. याच रकमेवर पुतण्यानेच डल्ला मारला आणि ही चोरी पचावी म्हणून आरोपीने आपलेही घर फोडले. चोरी करताना हुशारी करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी जलद गतीने आरोपींच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी केलेल्या या तपासाचे तालुक्यात कौतुक होऊ लागले आहे. 


यांनी केला तपास !

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक ओलेकर, खरात, हवालदार वाडदेकर, कर्मचारी सागर गवळी, सुर्वे यांनी या गुन्ह्याचा तपास केला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ओलेकर हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments