31 मे च्या आधीच करा गाडीची टाकी फुल; नाहीतर…
मुंबई :गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डीझेलचे दर खूप वाढत होते. भूतो नं भविष्यती अशी दरवाढ झाल्यावर लोकांचा रोष मोठ्या प्रमाणात वाढला. अशातच केंद्र सरकारने काही कर कमी केला व त्यासोबत राज्य सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलवरील शुल्क आणि इतर कर कमी केले. मात्र अजूनही वाद संपलेला नाही कारण अद्यापही पेट्रोलचे दर 100 पेक्षा कमी झालेले नाहीत. अशातच या वादात पंप चालकांनी उडी घेतली आहे. 2017 पासून कंपन्यांनी डिलर कमिशनमध्ये वाढ केलेली नाही. मागील काही वर्षांपासून पंप चालकांनी डिलर कमिशन वाढवण्याची मागणी केली होती, मात्र अद्याप कंपन्यांनी ही मागणी पूर्ण न केल्याने पेट्रोल डिलर्सने इंधन खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे.
एकिकडे केंद्रानं पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केलेले असतानाच तिथं पंप चालक- मालकांनी मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली. सरकारच्या निर्णयामुळे या मंडळींचं मोठं नुकसान झाल्याची आकडेवारीही समोर आली. सरतेशेवटी सरकारचा विरोध करण्यासाठी म्हणून महाराष्ट्रासमवेत संपूर्ण देशभरात 31 मे या दिवशी कोणत्याही प्रकारची इंधन खरेदी न करता संपाची हाक देण्यात आली आहे.
संघटनेच्या या भूमिकेमुळे 31 मे रोजी राज्यात इंधनाचा तुटवडा जाणवण्याची भीती आहे. त्यामुळे आदल्यादिवशीच पंपांवर इंधन भरण्यासाठी गर्दी होऊ शकते. तसेच 31 तारखेला इंधन पुरवठ्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. महामार्गांवर, निमशहरी आणि ग्रामीण भागातील छोट्या पंपावर इंधनाचा साठा संपण्याची शक्यता आहे.


0 Comments