दहावी-बारावीच्या निकालाबाबत धक्कादायक बातमी, विद्यार्थी-पालकांचा जीव टांगणीला..!
कोरोनाचा कहर कमी झाल्याने यंदा दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने नुकत्याच पार पडल्या.. अर्थात, त्यावर आक्षेप घेत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याच्या मागणीसाठी अनेक विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते.. मात्र, ठाकरे सरकारने आपल्या निर्णयावर ठाम राहत, ऑफलाईन पद्धतीनेच या परीक्षा घेतल्या..
नुकत्याच या परीक्षा संपल्या.. त्यामुळे विद्यार्थ्यांचा नजरा आता निकालाकडे लागल्या आहेत. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दहावी-बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर केले जाणार असल्याचं नुकतेच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं होतं.. त्यानुसार 11वी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रकही जाहीर झालं..
शिक्षकांचा पेपर तपासणीवर बहिष्कार
एकीकडे अशी सगळी तयारी सुरु असताना, आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.. ती म्हणजे, दहावी-बारावी परीक्षांचे निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. शिक्षकांनी मूल्यांकनावर बहिष्कार घातल्याने वेळेवर निकाल जाहीर करणं अशक्य असल्याचं बोललं जात आहे.
सातत्याने पाठपुरावा करुनही विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्याच्या कामावर शिक्षकांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. या उत्तरपत्रिका वेळेवर तपासल्या न गेल्यास, निकाल उशिरा जाहीर होण्याची शक्यता पुन्हा वाढली आहे. विनाअनुदानित शाळांना सरकारने 100 टक्के सरकारी अनुदान तातडीने देण्यास सुरुवात करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र बोर्डाचे अनेक शिक्षक आक्रमक झाले आहेत. त्यासाठी या शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासण्याच्या कामावर बहिष्कार घातला आहे..
विशेष म्हणजे, राज्य शिक्षण मंडळाकडून उत्तरपत्रिका तपासणीचे काम वेगात सुरु करण्यात आले होते. त्यामुळे निकाल वेळेवरच जाहीर होणार असल्याचे बोलले जात असताना, शिक्षकांनी मूल्यांकन प्रक्रियेवर बहिष्कार घातला.. त्यामुळे हे निकाल लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे..
निकाल उशिरा झाल्यास पुढील प्रक्रियेलाही विलंब होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी-पालकांचा जीव टांगणीला लागलाय, हे नक्की..!


0 Comments