होय, मी सासऱ्याचा खून करून आलोय !
पुणे : 'साहेब, मी माझ्या सासऱ्याचा मर्डर करून आलोय' असे म्हणत रक्ताळलेला चाकू घेऊन एक व्यक्ती थेट पोलीस ठाण्यात पोहोचला असल्याची घटना पुण्याच्या खडकी पोलीस ठाण्यात पोहोचली. त्याचा हा आवेश पाहून पोलीस देखील चक्रावले !
गुन्हेगार खुनासारखे गंभीर कृत्य केल्यानंतर पळून जातो. आपले नाव येऊ नये आणि याप्रकरणी आपणास अटक होवू नये यासाठी काळजी घेत असतो. पोलिसांनी पकडले तरी आपला काही संबंध नसल्याचे तो दाखवत पोलिसांना गुंगारा देत असतो, हुलकावण्या देत असतो. काही गुन्हेगार मात्र पोलिसांना थेट कबुलीही देतात आणि कुणी स्वत: पोलिसात हजर देखील होतात. पुण्यात मात्र एका जावयाने आपल्या सासऱ्याचा खून केला आणि रक्ताने माखलेला चाकू घेवून थेट पोलीस ठाण्यात हजर झाला आणि आपण केलेल्या खुनाची कबुलीही पोलिसांना देवून टाकली. हा खुनी जावई चाकूसह पोलीस ठाण्यात आल्यावर काही क्षण पोलीस देखील चक्रावून गेले होते.
खडकी बाजार येथे राहणारा जावई अशोक गुलाब कुडले याने आपले ६५ वर्षे वयाचे सासरे रमेश रामचंद्र उत्तरकर यांचा चाकूने सपासप वार करून खून केला. अशोक कुडले आणि त्याची पत्नी यांच्यात गेल्या दोन तीन वर्षांपासून वाद होता त्यामुळे पती पत्नी वेगळे रहात होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी अपत्ये देखील आहेत.
कुडले याची पत्नी वादामुळे वडिलांच्या घरी राहते. आपल्या पत्नीला नांदायला पाठवा म्हणून सासरे रमेश उत्तरकर यांच्या मागे लागला होता पण सासरे पाठवायला तयार नव्हते. आपल्या मुलीने घटस्फोट घ्यावा असा त्यांचा प्रयत्न होता आणि यासंदर्भात न्यायालयात नुकतीच एक तारीख देखील झालेली होती.
न्यायालयातील तारीख झाल्यानंतर अशोक कुडले आणि उत्तरकर यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर सासरे उत्तरकर हे आपल्या कापड दुकानात बसलेले असताना जावई अशोक कुडले हा तेथे आला आणि त्याने थेट सासरे रमेश उत्तरकर यांच्यावर चाकूने सपासप वार करायला सुरुवात केली. काय घडतेय हे आजूबाजूला कळण्याआधीच सपासप वार करून अशोक कुडले याने आपले सासरे उत्तरकर याने गंभीर जखमी केले आणि त्याच क्षणी त्यांचा जागीच मृत्यू देखील झाला.
चाकूसह पोलीस ठाण्यात
आपल्याच सासऱ्याचा खून केल्यानंतर कुडले हा कुठेही पळून गेला नाही तर रक्ताळलेला चाकू घेऊन पोलीस ठाण्यात आला. आपण आपल्या सासऱ्याचा खून केला असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि नंतर खातरजमा करून त्याला अटक केली आहे.


0 Comments