google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 उजनी कालव्यात पोहायला गेलेला मुलगा बेपत्ता !

Breaking News

उजनी कालव्यात पोहायला गेलेला मुलगा बेपत्ता !

 उजनी कालव्यात पोहायला गेलेला मुलगा बेपत्ता !

टेंभुर्णी : उजनी कालव्यात पोहोण्यासाठी गेलेला पंधरा वर्षे वयाचा मुलगा बेपत्ता झाला असून या घटनेमुळे कालवा परिसरात चिंता व्यक्त होऊ लागली आहे.


भीमा नदीच्या पात्रात पोहोण्यासाठी गेलेल्या अनेक मुलांना जलसमाधी मिळाल्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडलेल्या आहेत. त्यात वाळूचोरीचे खड्ड्यांमुळे अशा घटना घडत असतात पण माढा तालुक्यातील भीमनगर येथील एका पंधरा वर्षाचा मुलगा कालव्यातील पाण्यात वाहून गेला असल्याने चिंता व्यक्त होऊ लागली आहे. 


उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरले असून उजव्या आणि डाव्या कालव्यातून पाणी  सोडण्यात आले आहे. सद्या उन्हाळ्याचे दिवस असून तापमान आणि उन्हाची तीव्रता वाढत आहे त्यामुळे कालव्याच्या पाण्यात पोहोण्याचा अनेकजण प्रयत्न करताना दिसतात. अशाच प्रयत्नात पंधरा वर्षे वयाचा मुलगा वाहून गेल्याने कालव्यात उतरण्यापूर्वी विचार करण्याची वेळ आलेली आहे. 


भीमनगर येथील पंधरा वर्षे वयाचा रोहन सुरेश पवार हा पोहण्यासाठी उजनी कालव्यात उतरला. तीन हजार क्युसेक्सचा प्रवाह कालव्यात असताना या पाण्यात तो उतरला होता. उन्हाळा आणि उकाडा यामुळे अनेक मुले कालव्यात रोज पोहायला जाताना दिसतात. अन्य काही मुलांच्या सोबत रोहन देखील कालव्यात पोहोण्यासाठी उतरला. विशेष म्हणजे त्याला पोहोता येत नसताना त्याने हे धाडस केले आणि हे धाडस अखेर चुकीचे ठरले. पोहोता येत नाही म्हणून त्याने दोरीच्या सहाय्याने पोहोण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने त्याच्या हातातील दोरी सुटली आणि तो कालव्यातील प्रवाही पाण्यासोबत वाहून गेला. पाण्याला वेग असल्याने काही क्षणात तो दिसेनासा झाला. 


शोध घेतला पण -- !

क्षणार्धात रोहन कालव्याच्या पाण्यात अदृश्य झाल्यानंतर स्थानिक नागरिक आणि मच्छिमार यांनी त्याचा शोध घेतला पण तो या पाण्यात आढळून आला नाही. कालव्यातून तीन हजार क्युसेक्सचा प्रवाह सुरु होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस देखील तातडीने घटनास्थळी पोहोचले. या घटनेने खळबळ तर उडालीच पण चिंता देखील व्यक्त होऊ लागली आहे. 


कालव्यात उतरणे टाळावे !

रोहनच्या बेपत्ता होण्याच्या घटनेने इतर मुलांनी सावध होण्याची गरज असून पोहोण्यासाठी कालव्यात उतरण्याचे धाडस न करणेच हिताचे ठरणार आहे. कालव्यात पाण्याचा प्रवाह वेगवान असतो शिवाय कालव्याला असलेल्या अस्तरीकरणामुळे सहजासहजी पाण्याबाहेर निघणे अवघड असते. रोहन याला तर पोहोता येत नसताना त्याने हे धाडस केले आणि मोठी दुर्घटना घडली आहे.

Post a Comment

0 Comments