सोलापूरच्या माजी मंत्र्यांनी वाचली आपल्याच मृत्यूची पोस्ट !
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील शिवसेनेचे माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांच्या निधनाची एक पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल झाली आणि प्रचंड खळबळ उडाली, आपल्याच मृत्यूची पोस्ट पाहून खंदारे यानाही धक्का बसला.
सोशल मीडिया हे एक अत्यंत प्रभावी आणि उपयोगी व्यासपीठ आहे पण त्याच्या चांगल्या उपयोगापेक्षा वाईट वापर करणाऱ्या मोजक्या समाजकंटकामुळे तो बदनाम होत असल्याचे अनेकदा पाहायला आणि अनुभवायलाही मिळत असते. काही जण याचा अफवा पसरविण्यासाठी दुरुपयोग करीत असतात आणि त्यामुळे अनेकदा सामाजिक हानी होते तर कधी एखाद्या व्यक्तींना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. सोलापूर उत्तर सोलापूर विधानसभा मतदार संघातील माजी आमदार आणि शिवसेनेचे माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांना देखील आज असाच मनस्ताप सहन करण्याची वेळ आली.
उत्तमप्रकाश खंदारे यांचे निकटवर्तीय असलेले सूर्यप्रकाश खंदारे यांच्या फेसबुकवरून उत्तमप्रकाश खंदारे यांच्या निधनाची पोस्ट व्हायरल करून खंदारे यांच्या निधनाची अफवा पसरविण्यात आली ज्यांनी ज्यांनी ही पोस्ट पहिली त्यांना धक्का बसणे स्वाभाविक होते.
सोलापूर शहरात देखील या पोस्टमुळे गोंधळ उडाला. अनेकजण परस्परांकडे चौकशी देखील करू लागले. दस्तूरखुद्द उत्तमप्रकाश खंदारे हे देखील या प्रकारामुळे हैराण झाले असून या खोडसाळपणा बद्धल त्यांनी संताप व्यक्त केला आहे. या अफवेमुळे आंबेडकर नगर मधील त्यांच्या निवासस्थानी कार्यकते, समर्थक यांची मोठी गर्दी झाली होती.
प्रकृती उत्तम !
उत्तमप्रकाश खंदारे यांची प्रकृती उत्तम असून फेसबुकवरून फिरत असलेली पोस्ट ही चुकीची आणि खोडसाळपणाची असल्याचे खंदारे आणि त्यांच्या निकटवर्तीयानी स्पष्ट केले आहे. वस्तुस्थिती समोर येईपर्यंत मात्र अनेकांना धक्का बसला होता. असा खोडसाळपणा करणाऱ्या व्यक्तीबाबत मात्र संपताचे पडसाद उमटत होते.
तक्रार करणार !
कोणीतरी जाणीवपूर्वक हा खोडसाळपणाचा प्रकार केलेला असून हा प्रकार आहे हे मला समजत नाही, या प्रकाराबाबत मात्र आपण सायबर पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांनी सांगितले आहे. त्यांच्या अनेक समर्थकांनी देखील या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे.
अशी होती पोस्ट !
मा. माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश बाबुराव खंदारे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. तरी देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो. तरी खंदारे समर्थक, लहूजी शक्तीसेना या सर्वांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी राहत्या घरी उपस्थित राहावे. शोकाकुल : उत्तमप्रकाश खंदारे व मित्र परिवार


0 Comments