रेशन कार्डच्या नियमांत मोठा बदल, ‘या’ लोकांना नाही मिळणार स्वस्त रेशनचा लाभ..!
भारतीय नागरिकत्वाचा महत्वाचा पुरावा म्हणजेच रेशनकार्ड.. अर्थात शिधापत्रिका..! याच रेशनकार्डच्या आधारे सरकारी योजनांचा लाभ नागरिकांना दिला जातो.. देशातील गरिबांना स्वस्त दरात धान्य मिळते. त्यामुळे आजही मोठ्या प्रमाणात रेशनकार्डचा वापर होताना दिसतो..
कोरोनामुळे लाॅकडाऊन केल्यानंतर अनेक लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. अशा वेळी केंद्र व राज्य सरकारने रेशनकार्डच्या माध्यमातूनच गरीब लोकांना मदत केली.. मोफत धान्यांचे वाटप केलं… त्यानंतर सरकारने सातत्याने मोफत रेशन वाटपास मुदतवाढ दिलीय.. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळाला..
दरम्यान, अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने आता रेशन कार्डच्या नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात त्याचा काही रेशन कार्डधारकांना फायदा होईल, तर काहींना फटकाही बसू शकतो..
रेशनच्या नियमांत बदल…
देशभरातील 80 कोटी नागरिक सध्या ‘राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्या’चा लाभ घेत असल्याची अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाची आकडेवारी सांगते.. मात्र, या योजनेतही मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असून, असे अनेक लोक आहेत, जे आर्थिकदृष्ट्या सक्षम असतानाही या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे खऱ्या लाभार्थींपर्यंत ही योजनाच पोहोचत नाही..
ही बाब समोर आल्यानंतर मोदी सरकारने रेशनच्या नियमांत मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना त्यातून तातडीने काढून टाकण्यात येणार आहे. त्यासाठी अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने काम सुरु केले असून, आता केवळ गरजू लोकांनाच याेजनेचा लाभ मिळू शकेल..
तसेच राज्य सरकारांसोबत बैठका घेण्यात येत असून, त्यांच्या सूचना आल्यानंतर या योजनेअंतर्गत नवे निकष तयार केले जातील. ज्यात फक्त पात्र लोकांनाच सहभागी करून घेतले जाईल. अपात्र लोकांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार नाही.
मोदी सरकारने देशभरात ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजना सुरु केली आहे. सध्या ही योजना 32 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत संपूर्ण देशात फक्त एकच रेशनकार्ड जारी केले जाणार आहे. त्यामुळे कोणताही लाभार्थी कोणत्याही राज्यात, कोणत्याही दुकानदाराकडून रेशन घेऊ शकणार आहे..


0 Comments