हायकोर्टाचा मोठा निकाल ... आई-वडील हयात असेपर्यंत मुलांचा मालमत्तेवर हक्क नाही...
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने एका निकालात आई-वडील हयात असेपर्यंत मुलांचा त्यांच्या मालमत्तेवर कोणत्याही प्रकारचा हक्क असू शकत नाही, असे स्पष्ट केले आहे. न्यायालयाने असे नोंदविले आहे कि, आई-वडील जिवंत असताना असा हक्क मागणेही हास्यास्पद आहे.
फ्लॅट आणि त्यांचे पालकत्व असा अर्ज
या घटनेत पती मागील दहा वर्षांपासून डिम्नेशिया आजाराने त्रस्त असून कोमामध्ये आहेत. त्यांच्या नावावर असलेला फ्लॅट आणि त्यांचे पालकत्व मिळावे, हा फ्लॅट विकून मिळणाऱ्या पैशांतून त्यांच्या औषधांचा आणि अन्य खर्च करायचा आहे, अशी मागणी पत्नीच्यावतीने उच्च न्यायालयात याचिकेद्वारे करण्यात आली होती.
या मागणीला त्यांच्या मुलाने विरोध करत स्वतंत्र अर्ज केला. या अर्जात आई किंवा वडील यांच्या नावावरील फ्लॅटवर मुलगा या नात्याने माझा हक्क आहे, असा दावा मुलाने केला होता. यावर न्या. गौतम पटेल आणि न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. खंडपीठाने मुलाचा अर्ज नामंजूर केला.
अंतिम व्यवहार न्यायालयाच्या परवानगीने
याबाबतीत न्यायालयाने असे निरीक्षण नोंदविले कि, मुलगा या नात्याने आई किंवा वडिलांच्या नावावर असलेल्या फ्लॅटमध्ये ते हयात असेपर्यंत मुलगा भागीदारी किंवा हक्क सांगू शकत नाही. आईला न्यायालयाने वडिलांचे पालकत्व देत फ्लॅटचा व्यवहार करण्याची मुभा दिली आहे. मात्र अंतिम व्यवहार न्यायालयाच्या परवानगीने करण्याचा आणि सर्व हिशोब लिखित स्वरूपात पतीच्या उपचारासाठी करण्याचे निर्देश दिले.
आई-वडील हयात असताना त्यांच्या फ्लॅटमध्ये हिस्सा मिळू शकत नाही
मुलाच्या वतीने असा युक्तिवाद करण्यात आला होता कि, वडिलांचे दोन्ही फ्लॅट ही भागीदारी असलेली मालमत्ता आहे आणि मुलगा या नात्याने या मालमत्तेवर माझा अधिकार आहे. हा युक्तिवाद अतार्किक, आधारहिन आणि हास्यास्पद आहे, असे खंडपीठाने सुनावले.
कोणत्याही वारसा हक्कानुसार मुलाला त्याचे आई-वडील हयात असताना त्यांच्या फ्लॅटमध्ये हिस्सा मिळू शकत नाही, असे स्पष्ट करत खंडपीठाने मुलाचा हस्तक्षेप अर्ज नामंजूर केला. वडिलांच्या नावावर एक फ्लॅट असून आईच्या नावावर एक फ्लॅट आहे. मुलगा आई-वडिलांपासून वेगळा राहतो, असे याचिकेत म्हटले आहे.


0 Comments