आमदार सुभाष देशमुखांना आमदार प्रणिती शिंदेंनी केले 'ओव्हरटेक' ; सुरेश हसापुरेंचे वाढले वजन
सोलापूर : दक्षिण सोलापूर मतदार संघाचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांना काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या भारी पडल्या आहेत. आमदार प्रणिती शिंदे यांचा मतदारसंघ शहर मध्य असतानाही त्यांनी दक्षिण तालुक्यात तब्बल सोळा कोटीचा विकास निधी दिला आहे.
काँग्रेसचे नेते सुरेश हसापुरे यांनी कायम पाठपुरावा केला त्यांच्या पाठपुराव्यानंतर सोळा कोटीचा निधी प्रणिती शिंदे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध रस्ते तसेच ब्रिज साठी मंजूर करून दिला. भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री तथा दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांनी 2014 ते 2019 दरम्यान दक्षिण सोलापूर तालुक्यात रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला होता.
मात्र ज्येष्ठ नेते सुरेश हसापुरे हे काँग्रेस मध्ये आल्यापासून त्यांनी तालुक्यातील रस्ते आणि इतर कामांसाठी आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्फत शासन दरबारी पाठपुरावा सुरू ठेवला होता. आमदार प्रणिती शिंदे यांनी अखेर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या कडून दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी 16 कोटींचा निधी मंजूर करून आणला.
सोलापूर डोणगाव ते तेलगाव रस्ता 1 कोटी 42 लाख, कंदलगाव-गुंजेगाव जोडणारा रस्ता 1 कोटी 42 लाख, टाकळी चिंचपूर, बरूर,हत्तरसंग कुडल रस्ता 1 कोटी 42 लाख, येळेगाव, वांगी, गावडेवाडी, मंद्रुप, नांदणी रोड 4 कोटी 27 लाख, हत्तुर, मदरे, होटगी स्टेशन, लिंबी चिंचोळी, रामपूर ब्रिज बांधणे 3 कोटी 32 लाख, बोळकवठे ते नांदणी रस्ता 1 कोटी 90 हजार, भंडारकवठा, माळकवठा, औज, मंद्रुप, तद्देवाडी 2 कोटी 85 लाख एवढा निधी मंजूर झाला आहे.
यावरून महाविकास आघाडी सरकारने भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या विकास निधीला ब्रेक लावला मात्र आपल्या पक्षाचे नेते सुरेश हसापुरे यांना आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्फत निधी दिला आहे. यावरून सुरेश हसापुरे यांचे तालुक्यात आणि काँग्रेस पक्षात वजन वाढल्याचं चित्र आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील जनता आमदार प्रणिती शिंदेंचे आभार व्यक्त करत आहे.



0 Comments