" लॉकडाऊनच्या काळात दाखल सर्व गुन्हे मागे घेणार " , दिलीप वळसे पाटलांची माहिती
लॉकडाऊनच्या काळात नियमांचे उल्लंघन केल्याने गुन्हे दाखल झालेल्या सर्व विद्यार्थी आणि नागरिकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय गृह विभागाकडून घेण्यात आला आहे. तसेच मंत्रिमंडळाकडून या निर्णयाला मान्यता मिळाल्यानंतर प्रक्रियेला सुरुवात होईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना दिलीप वळसे पाटील म्हणाले की,‘कोरोना संक्रमण काळात संचारबंदीचे नियम मोडणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या सर्व विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय गृह विभागाने तत्त्वतः घेतला आहे.
’दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘या संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मांडण्यात येईल. त्याद्वारे विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्यावर विचार केला जाईल, जेणेकरून त्यांना भविष्यात वा परदेशी शिक्षणासाठी जाताना अडचणींचा सामना करावा लागू नये, हा आमचा प्रयत्न राहील,’ असेही गृहमंत्री म्हणाले.


0 Comments