मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यांची मालमत्ता जप्त !
मुंबई : महाविकास आघाडीच्या एकेका नेत्यांच्या मागे ईडी लागलेली असताना आज थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्याची सहा कोटींपेक्षा अधिक किमतीची मालमत्ता ईडीने जप्त केल्याने राज्यभरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आले आणि भारतीय जनता पक्षाचे सत्तेचे स्वप्न हिसकावले गेले तेंव्हापासून राज्यातील महाविकास आघाडीचे नेते आणि सरकार मधील मंत्री यांच्यावर ईडी, आयकर, सीबीआय अशा विविध यंत्रणांनी सळो की पळो करून सोडले आहे. भाजपचे काही नेते आधीच या कारवाईबाबत जाहीर करतात आणि त्याप्रमाणे कारवाई झालेली पाहायला मिळते. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप गेल्या काही काळात सतत होत असतानाही या कारवाया सुरु आहेतच पण आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच टार्गेट ठरले असून त्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या सहा कोटींपेक्षा अधिक किमतीची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने जप्त केल्या आहेत.
महाविकास आघाडीच्या नेत्यापर्यंत होत असलेल्या ईडीच्या कारवाया आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. ठाण्यातील निलांबरी प्रकल्पातील अकरा सदनिका या पाटणकर यांच्या मालकीच्या असून पाटणकर हे रश्मी ठाकरे यांचे भाऊ उद्धव ठाकरे यांचे मेहुणे आहेत. पाटणकर यांच्यावर मनी लॉन्ड्रींग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याच मालमत्तावर आज अंमलबजावणी संचालनालयाने कारवाई केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या आधीच याबाबत तक्रार केली होती.
या घटनेने केंद्रीय तपास यंत्रणांवर पुन्हा आरोप केले जात असून भाजप या तपास यंत्रणांचा राजकीय कारणासाठी गैरवापर करीत होत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तसेच अन्य नेत्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर आरोप केले आहेतच पण राष्टवादीचे प्रमुख शरद पवार यांनी देखील आज पुन्हा याबाबत स्पष्ट भाष्य केले आहे.
यापूर्वी राष्ट्रवादीचे मंत्री अनिल देशमुख आणि त्यानंतर दुसरे मंत्री नवाब मलिक याना या आधीच अटक करण्यात आले आहे. आजच्या या घटनेने सुडाचे राजकारण कसे चाललेय हे महाराष्टाला पुन्हा दिसून आले अशा प्रतिक्रिया देखील राष्ट्रवादीच्या नेत्यानी व्यक्त केल्या आहेत.
या कारवाईनंतर भारतीय जनता पक्षाचे नेते कारवाईचे समर्थन करीत आहेत तर महाविकास आघाडीने नेते संताप व्यक्त करीत आहेत. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी या आधीपासूनच हे सुरु आहे. भाजपची हीच मानसिकता आहे, केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून महाविकास आघाडी सरकारला घाबरविण्याचे कारस्थान आहे पण महाविकास आघाडी अशा प्रकारांना घाबरणार नाही अशा प्रतिक्रिया महाविकास आघाडीतून येत आहेत.
राजकीय सूड !
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावर केलेल्या आजच्या कारवाईबाबत बोलताना राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी हा 'राजकीय सूड' असल्याचे म्हटले आहे. सर्व केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर हा सद्या देशाच्या सामोर्रील मोठा प्रश्न आहे. सत्ताधाऱ्याना त्रास देण्यासाठी राजकीय सुडाच्या हेतूने हा एक कार्यक्रम हातात घेण्यात आला आहे. पाच दहा वर्षांपर्यंत या ईडीचे नाव कुणाला माहित नव्हते, आता गावागावात ही ईडी पोहोचली आहे , दुर्दैवाने या सर्व यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे' असे देखील शरद पवार म्हणाले.
0 Comments