google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 लग्नाच्या वरातीत बेधुंद नाचला, पाणी पिताच जिवाला मुकला !

Breaking News

लग्नाच्या वरातीत बेधुंद नाचला, पाणी पिताच जिवाला मुकला !

 लग्नाच्या वरातीत बेधुंद नाचला, पाणी पिताच जिवाला मुकला !

बीड : मित्राच्या लग्नात बेधुंद होऊन आनंदाने नाचला पण घटाघटा पाणी पिताच मृत्यू झाला अशी दुर्दैवी घटना २५ वर्षाच्या तरुणाबाबत घडली असून या घटनेने मंगलकार्यात  शोककळा पसरली. 


मित्राचे लग्न अथवा अन्य कुठलीही मिरवणूक असली की मित्र मोठ्या आनंदाने वाद्याच्या तालावर बेधुंद होऊन नाचतात आणि त्याचा मोठा आनंद त्यांना वाटत असतो. मिरवणुकीत नाचता नाचता हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याच्या काही घटना याआधीही घडल्या आहेत. शिंदेवाडी येथे देखील लग्न समारंभात देखील अशीच एक दुर्दैवी घटना घडली आणि लग्नसोहळा शोकात बुडाला. शिंदेवाडी येथे अक्षय माने यांच्या विवाहाचा आनंदी सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यांचे मित्र वैभव राऊत या पंचवीस वर्षाच्या तरुणासह अनेक मित्र या सोहळ्यात सहभागी झालेले होते. अनेक मित्र या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आले होते त्यामुळे त्यांचा उत्साह वाढला होता आणि त्यांना मित्राच्या लग्नात नाचण्याची इच्छा होती. 


नवरदेवाला मारुतीच्या दर्शनाला नेताना निघालेल्या मिरवणुकीत वाद्याच्या तालावर अनेक मित्र बेधुंद होवून नाचू लागले. उन्हाची तीव्रता असतानाही बेधुद होऊन नाचणे बराच वेळ सुरूच होते. मित्राच्या लग्नाचा एक वेगळा आनंद सगळे घेत होते. नाचत नाचत मिरवणूक विवाहस्थळी आली. सगळेच नाचणारे मित्र थकले होते, घशाला कोरड पडलेली होती. वैभव राउत हा देखील दमला होता. विवाहस्थळी आल्यावर तो एका खुर्चीवर बसला. तहानलेला असल्याने तो घटाघटा पाणी पिला  आणि दुसऱ्याच क्षणी तो खाली कोसळला. त्याच्या छातीत जोराची कळ आली होती, हृदयविकाराचा जोराचा धक्का त्याला बसला होता. 


लग्नाची धामधूम सुरु असताना या घटनेने एकच गोंधळ उडाला. वैभवाला अचानक काय झाले हे कुणालाच कळाले नाही. तो कोसळला असला तरी त्याला उठविण्याचा प्रयत्न त्याचे मित्र करीत राहिले पण त्याने कसलाच प्रतिसाद दिला नाही. अखेर त्याला जवळच्याच एका दवाखान्यात नेण्यात आले पण डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले. एका क्षणात विवाह सोहळ्यावर शोकाचे वातावरण निर्माण झाले आणि गावावर देखील शोककळा पसरली.  विवाहाचा आनंदी सोहळा सुरु असतानाच वैभव राऊत याचा मृत्यू झाल्याने मंगल कार्यावर अमंगलतेची छटा पसरली गेली.

Post a Comment

0 Comments