मराठी भाषिकांनी वाचन व लेखन संस्कृती विकसीत करावी
प्रा. प्रदीप मोहिते
मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी मराठी माणसाने आपल्या या मनातला प्रथमत: न्यूनगंड काढून टाकला पाहिजे. आजच्या वास्तवात नीट बोलणे, नीट ऐकणे ,नीट लिहिणे महत्त्वाचे आहे. तरच आपली मराठी भाषा समृद्ध बनेल. यासाठी मराठी भाषिकांनी वाचन व लेखन संस्कृती विकसीत करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे असे मत यशवंतराव चव्हाणमहाविद्यालय, करमाळा येथील मराठी विभाग प्रमुख प्रा. प्रदीप मोहिते यांनी विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभागाने आयोजित केलेल्या "मराठी भाषा गौरव दिनानिमित्त" मराठी भाषा आणि मराठी माणूस या विषयावर व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. रघुनाथ फुले हे होते. व उपप्राचार्य प्रा. विजय कुमार घाडगे हेही उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा. प्रदीप मोहिते म्हणाले की, मराठी भाषेला खूप मोठी चांगली परंपरा आहे. माणसाला अन्न, पाण्या इतके भाषेचे महत्व आहे. भाषा हे माणसाच्या जगण्याचे साधन आहे. भाषा ही मानवाचा जीवन व्यवहार पूर्ण करते. मराठी माणसाने शालेय जीवनापासूनच मराठी भाषा बोलायला आणि नंतर लिहायला शिकवले पाहिजे. भाषा समृद्ध असेल तरच संस्कृती समृद्ध होते. परंतु आज आपण हिंदी, इंग्रजी मिश्रित शब्द बोलून आपण मराठीची हानी करीत आहोत ही खंत त्यांनी व्यक्त केले. वास्तविक पाहता म्हणी आणि आणि वाक्प्रचार यांचे करते आपणास माहीत नाहीत अशा नाव नसलेल्या माणसानेच खऱ्या अर्थाने मराठी भाषा जिवंत ठेवली आहे. वि. वा. शिरवाडकर, प्र. के. अत्रे, अण्णाभाऊ साठे, भालचंद्र नेमाडे, डॉ. गणेश देवी यासारख्या असंख्य साहित्यिकांनी मराठी भाषा समृद्ध केलेली आहे. हा वारसा अलीकडच्या काळातील साहित्यिक मंडळी करीत असल्याचे दिसते आहे असेही ते शेवटी म्हणाले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा. डॉ. रघुनाथ फुले म्हणाले की, आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात जी विविध साधने आणि सुविधा आपण वापरत आहोत त्याचा बऱ्याच वेळा अतिरेक होताना दिसत आहे. याचा परिणाम असा झाला आहे की, आज वाचन व लेखन संस्कृती कमी होताना दिसत आहे. आपल्या मराठी भाषेचा आपल्या बोली भाषेतूनच गोडवा वाढवला पाहिजे. विविध प्रदेशात असणाऱ्या बोली त्यांचे संवर्धन आणि जतन होण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. भाषा हे संवादाचे माध्यम म्हणून वापरून आपल्या जगण्याचे मार्ग शोधले पाहिजेत असे मत त्यांनी व्यक्त करून मराठी भाषेला जी उज्वल परंपरा आहे ती भविष्यात दर्जेदार साहित्य निर्मिती करून टिकवण्यासाठी मराठी भाषिकांनी पुढाकार घेतला पाहिजे असे ते म्हणाले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. किसन माने यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. डॉ. दीपक रिटे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा. किसन पवार यांनी मानले. सदर दूर दृश्य प्रणाली द्वारे घेण्यात आलेल्या कार्यक्रमास प्रा. प्रमोद शेटे, प्रा. जवाहर मोरे, प्रा. मुकुंद वलेकर, प्रा. डॉ. काकासाहेब घाडगे, कवी गोविंद काळे, प्रा. अशोक वाकडे तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments