डॉ रोंगे सरांनी मेडिकल कॉलेज काढावे. खासदार रणजितसिंह निंबाळकर.
डॉ. रोंगे सरांनी मेडिकल कॉलेज काढावे
-खासदार रणजितसिंह निंबाळकर
डॉ.बी.पी.रोंगे हा एक ब्रँड आहे
-मा.आमदार प्रशांत परिचारक
पंढरीमध्ये ‘डॉ.बी.पी. रोंगे हॉस्पिटल’ चे थाटात उदघाटन
पंढरपूर- (प्रतिनिधी)’कोरोना काळामध्ये डॉ.रोंगे सरांच्या कुटुंबाचे योगदान मी पाहिलेले आहे. या कुटुंबातील सर्व सदस्यांची सेवावृत्ती कौतुकास्पद आहे. रुग्णांना मनोभावे सेवा देण्याची वृत्ती स्तुत्य आहे. डॉ. रोंगे सरांनी आता दवाखान्याचा हा धागा पकडून पंढरपुरात मेडिकल कॉलेज काढावे. डॉ. रोंगे सरांच्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कर्तुत्वाने स्वेरीचा डोलारा उभा राहिला आहे.
कोरोना काळामध्ये मी त्यांना जवळून पाहिले आहे. सामाजिक बांधिलकी आणि कर्तृत्वाचा हा ठेवा सून आणि मुलगा यांनी देखील जपला आहे आणि पुढेही जपतील. यासाठी विठ्ठलाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या या कार्यामध्ये सातत्य आणि परिश्रम असल्यामुळे आपल्या प्रत्येक कार्यात यश मिळत आहे.’
असे प्रतिपादन माढा मतदार संघाचे लोकसभेचे सदस्य खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी काढले.
येथील रेल्वे स्टेशन परिसरात तुळशी वृंदावनजवळ ‘डॉ.बी.पी. रोंगे हॉस्पिटल’चे उदघाटन
विधान परिषदेचे सदस्य आमदार प्रशांत परिचारक यांच्या शुभ हस्ते झाले.
याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून खा. निंबाळकर बोलत होते. स्वेरीचे सचिव डॉ. बी.पी.रोंगे यांनी सर्वांचे स्वागत करून स्वेरीची वाटचाल आणि हॉस्पिटल उभारणी बाबत माहिती दिली. यावेळी डॉ. रोंगे सरांनी मोठ्या मालकांची म्हणजेच स्व.सुधाकरपंत परिचारक यांची आवर्जून आठवण काढली.
स्वेरीच्या स्थापनेत मोठ्या मालकांनी दिलेला आधार आणि नंतरच्या काळात स्वेरीची झालेली भरभराट यावरून ‘ज्या कार्यास आदरणीय मोठ्या मालकांचा स्पर्श होतो ते कार्य नेहमी यशस्वी होते.’असे प्रतिपादन केले. दिप प्रज्वलनानंतर प्रास्तविकात हॉस्पिटलच्या प्रमुख व प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. स्नेहा सुरज रोंगे यांनी ‘डॉ.बी. पी.रोंगे हॉस्पिटल’ हेच नाव का ठेवले? याचे गमक उलगडताना म्हणाल्या की
‘डॉ.बी.पी. रोंगे सरांनी शून्यातून शिक्षणाचे विश्व उभे करताना प्रामाणिकपणे परिश्रम केले आणि करत आहेत. अगदी त्याचप्रमाणे या वैद्यकीय सेवेकडे मी व्यवसाय म्हणुन न पाहता व्रत म्हणून पाहणार आहे. या हॉस्पिटलचे कार्य स्वेरीच्या धर्तीवरच चालणार आहे.’ असे सांगून हॉस्पिटल मधून रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा-सुविधा सांगितल्या.
उदघाटक आ. प्रशांत परिचारक म्हणाले की, ‘सध्या डॉ. बी.पी. रोंगे हा एक ब्रँड आहे. या हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी रुग्णसेवेत पाऊल टाकले आहे. डॉ.रोंगे सरांनी कोविडच्या काळात योगदान दिले आहे व त्यात सातत्य राखले आहे. रोंगे सरांचे हे कार्य पाहून मोठ्या मालकांना देखील खूप अभिमान वाटला असता. आता स्वेरीप्रमाणेच या वैद्यकीय क्षेत्रातही नक्कीच यश मिळेल.’
यावेळी सांगोला मतदार संघाचे आमदार अॅड. शहाजीबापू पाटील म्हणाले की, ‘सर्व सामान्य कुटुंबातील तरुणांच्या कष्टातून आणि जिद्दीतून स्वेरीची स्थापना झाली आणि प्रामाणिक कष्टातून यशस्वीपणे त्यांची वाटचाल सुरू आहे. या हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची सेवा घडो ही अपेक्षा आणि त्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो.’
पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी मनोगत व्यक्त करून ‘जनतेसाठी हे हॉस्पिटल सुरु केले असून स्वेरी प्रमाणेच हे देखील यशस्वी होईल कारण डॉ. रोंगे कुटुंबीयांची सेवा अखंड व प्रामाणिकपणे सुरु असुन आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा आहे.’ असे सांगितले. दैनिक पंढरी संचारचे संस्थापक बाळासाहेब बडवे, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे,
भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांतजी देशमुख यांनीही मनोगत मांडून हॉस्पिटल च्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी जावळी मतदार संघांचे माजी आमदार सदाभाऊ सपकाळ, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अरविंद गिराम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, मनसेचे दिलीप धोत्रे, सुधाकरपंत परिचारक पतसंस्थेचे चेअरमन प्रकाश पाटील,
पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन नागेश भोसले, धाराशिव शुगरचे चेअरमन अभिजीत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, पश्चिम महाराष्ट्र संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष किरण घाडगे, पांडुरंग सहकारी साखर कारखाना, श्रीपुरचे व्हाईस चेअरमन कैलास खुळे,
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, पंढरपूर नोटरीचे अॅड. यासिन शेख, डॉ.संभाजी पाचकवडे, डॉ.श्रीकांत देवकते, उमेश पाटील, नगरसेवक विवेक परदेशी, विठाई पतसंस्थेचे जयवंत भोसले, पश्चिम महाराष्ट्र बळीराजा शेतकरी संघटनेचे माऊली हळनवर, उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर, भाजपाचे भाऊसाहेब अंबुरे, मंगळवेढ्याच्या नगरसेविका रतन पडवळे,
नगरसेवक डी राज सर्वगोड, माजी जिल्हाप्रमुख हनुमंत चवरे आर्किटेक्ट स्नेहा बागल, उद्धव बागल, शशिकांत पाटील, शहाजी साळुंखे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, स्वेरी परिवारातील पदाधिकारी व विश्वस्त उपस्थित होते. ‘डॉ.बी. पी.रोंगे हॉस्पिटल’चा उदघाटन सोहळा हा कोरोनाच्या सर्व नियमावलींचे पालन करून संपन्न झाला. कोविड-१९ मुळे कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही
त्यांच्यासाठी लाईव्ह फेसबुक लिंकद्वारे उदघाटन सोहळा पाहण्याची सोय केली होती. त्यामुळे राज्यभर अनेकांनी घरी बसूनच हा कार्यक्रम पहिला. स्वेरीच्या विश्वस्त सौ. प्रेमलता बब्रुवाहन रोंगे व सौ. अलका हणमंत बागल यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम सोहळ्याचे उत्तम
नियोजन झाले. सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले तर डॉ. विश्वासराव मोरे यांनी आभार मानले.
0 Comments