परिवहन आयुक्तालयाने काढलेल्या नव्या आदेशानुसार बेशिस्त वाहनचालकांवर आता वाढीव दंडानुसार कारवाई होणार
सोलापूर : परिवहन आयुक्तालयाने काढलेल्या नव्या आदेशानुसार बेशिस्त वाहनचालकांवर आता वाढीव दंडानुसार कारवाई होणार आहे.सहा दिवसांच्या समुपदेशनानंतर आता सोमवारपासून (ता. 3) दररोज बेशिस्तांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
विनालायसन्स वाहन चालविणाऱ्याला तब्बल पाच हजारांचा तर हेल्मेट नसल्यास पाचशे रुपयांचा दंड आणि त्या दुचाकीस्वाराचा वाहन परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाणार आहे. दंडाची रक्कम रोखीने किंवा ऑनलाइन पद्धतीने जागेवरच भरावी लागणार आहे.
महामार्गांची कनेक्टिव्हिटी वाढल्यानंतर रस्त्यांवरील वाहनांची संख्याही भरमसाठ झाली आहे. मात्र, बेशिस्त वाहतूक विशेषत: रस्ते अपघात व त्यातील मृत्यू कमी झालेले नाहीत. रस्ते अपघात व मृत्यूमध्ये सोलापूर शहर ग्रामीणचा राज्यातील टॉप टेन शहर- जिल्ह्यांत समावेश आहे. ही ओळख पुसण्यासाठी आता शहर पोलिस आयुक्तालयाने बेशिस्त वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याचे नियोजन केले आहे. त्यात प्रामुख्याने 28 मुद्द्यांवर कारवाई केली जाईल. त्यामध्ये लायसन्स नाही, विमा नाही क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी तथा माल वाहतूक, ट्रिपल सीट दुचाकी चालविणे, मोबाईल टॉकिंग, ड्रंक ऍण्ड ड्राईव्ह, शिकाऊ चालकासोबत प्रशिक्षक नाही, सार्वजनिक ठिकाणी वाहन थांबवणे, चुकीच्या दिशेने वाहन चालविणे,
नोंदणी होण्यापूर्वीच वाहनाचा वापर करणे, सिग्नल नियम मोडणे, मोठ्या आवाजाचे हॉर्न, विना गणवेश वाहन चालविणे, वन-वेतून गाडी नेणे, नो पार्किंगच्या ठिकाणी वाहन लावणे, बेकायदेशीर नंबरप्लेट (दादा, मामा वगैरे), विना सीटबेल्ट चारचाकी चालविणे, वाहनात मोठ्या आवाजात गाणी, संगीत लावणे अशा मुद्द्यांचा समावेश आहे.
3 जानेवारीपासून बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध थेट दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. विशेष म्हणजे त्यांना आता जागेवरच दंड भरावा लागणार आहे. दंडाची रक्कम न भरल्यास त्यांची गाडी जप्त केली जाणार असून दंड भरल्यावरच ती सोडली जाणार आहे.
दंडाची वाढीव रक्कम...
विनालायसन्स वाहन चालविणे : 5,000
क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी : प्रत्येकी 200
दुचाकीवर ट्रिपल सीट : 1000 व वाहन परवाना निलंबित
नोंदणीविना वाहन चालविणे : 2000
सिग्नल नियमांचे उल्लंघन : 500 व त्यानंतर 1500
वाहनावरील विमा संपला : 2000
मोबाईल टॉकिंग : 1000
मल्टी हॉर्न : 500 ते 1500
रस्ते अपघाताची संख्या नियंत्रणात आणून अपघाती मृत्यू कमी करण्याच्या हेतूने बेशिस्तांवर कडक कारवाई केली जाणार आहे. सहा दिवसांच्या समुपदेशनानंतर सोमवारपासून वाढीव दंडानुसार कारवाई होईल.
- डॉ. वैशाली कडूकर पोलिस उपायुक्त, सोलापूर शहर
0 Comments