google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 जिल्हाध्यक्ष कोण ? शरद पवारांच्या भेटीसाठी साठे मुंबईत दाखल !

Breaking News

जिल्हाध्यक्ष कोण ? शरद पवारांच्या भेटीसाठी साठे मुंबईत दाखल !

 जिल्हाध्यक्ष कोण ? शरद पवारांच्या भेटीसाठी साठे मुंबईत दाखल !


सोलापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या  जिल्हाध्यक्षपदाचा  राजीनामा दिल्यानंतर बळिराम साठे  हे मुंबईत दाखल झाले आहेत.प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांची ते भेट घेणार आहेत. साठे सध्या मुंबईत आहेत तर नव्या जिल्हाध्यक्ष पदासाठी माजी आमदार दीपक साळुंखे  व जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील  यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. श्रेष्ठी कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ टाकणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 



साठे यांचा राजीनामा स्वीकारणार का? याबद्दलदेखील साशंकता व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीत जिल्हाध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांना भेटण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळाने गुरुवारी प्रदेशाध्यक्ष पाटील यांची भेट घेतल्याचे समजते. आज (शुक्रवारी) हे शिष्टमंडळ शरद पवार यांची भेट घेण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यात पंढरपूर , मंगळवेढा , माळशिरस , मोहोळ या तालुक्‍यांतील राष्ट्रवादीत गटबाजीची प्रचंड धुसफूस सुरू आहे. ही गटबाजी कशी मिटणार? याबद्दलही उत्सुकता निर्माण झाली आहे.



'जनता दरबार'च्या  माध्यमातून जिल्हा कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील मोहोळ तालुक्‍यातील माजी आमदार राजन पाटील  यांच्यावर आरोपांवर आरोप करत आहेत. त्यामुळे त्यांच्या जिल्हाध्यक्षपदाला माजी आमदार राजन पाटील यांचा सर्वात मोठा विरोध असणार आहे. याशिवाय उमेश पाटील यांच्या माध्यमातून नव्या दमाच्या व्यक्तीकडे जिल्हाध्यक्षपद गेल्यास राष्ट्रवादीतील ज्येष्ठ मंडळी नाराज होण्याची शक्‍यता आहे. दीपक साळुंखे यांनी विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केली. शिवसेना  उमेदवार तथा आमदार शहाजी पाटील  यांच्या प्रचार सभेत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार  यांच्यावर साळुंखे यांच्यासमोर झालेली टीका या गोष्टी देखील आगामी काळात समोर येण्याची शक्‍यता आहे.



'शेकाप'ला कसे समजावणार?

2019 च्या विधानसभा निवडणुकीत सांगोल्यात शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) आणि राष्ट्रवादीची आघाडी होती. या निवडणुकीत माजी आमदार साळुंखे यांनी बंडखोरी केली. शेवटच्या टप्प्यात शिवसेनेला पाठिंबा दिला. कै. गणपतराव देशमुख  यांच्या हयातीत त्यांना सांगोल्यात शेकापचे उमेदवार तथा नातून डॉ. अनिकेत देशमुख यांचा पराभव पाहावा लागला. ही गोष्ट आजही सांगोल्यातील शेकापप्रेमींना खटकत आहे. ज्यांच्यामुळे पराभव झाला त्यांनाच राष्ट्रवादीने पुन्हा जिल्हाध्यक्षपदाची संधी दिल्यास शेकापला कसे समजावणार, असा प्रश्‍न उपस्थित होण्याची शक्‍यता आहे.



जनमानसाचा घेणार का कौल?

जिल्हाध्यक्ष कोण असावा? यासाठी त्रयस्थ यंत्रणेच्या माध्यमातून सर्व्हे, राष्ट्रवादीत सध्या काम करत असलेल्या युवक व ज्येष्ठ नेत्यांचा अभिप्राय विचार घेणार का? या माध्यमातून समोर येणाऱ्या व्यक्तीला जिल्हाध्यक्षपदाची संधी मिळणार का? याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

Post a Comment

0 Comments