सोलापूर : ९ १ वर्षांनंतर विद्युत इंजिनद्वारे धावली रेल्वे
सोलापूर : भारतात ३ फेब्रुवारी १९२५ रोजी पहिली विजेवरील रेल्वे धावली. मात्र सोलापूर विभागात विजेवरील रेल्वे सुरू होण्यास तब्बल ९१ वर्षांचा कालावधी लागला आहे. सोलापूर स्थानकावरून बेंगळुरूपर्यंत विजेवर रेल्वे धावत असल्याने अनेक वर्षांपासूनचे सोलापूरकरांचे स्वप्न आता सत्यात उतरले आहे.
स्थानकावरून म्हैसूर-सोलापूर-म्हैसूर बसवा एक्सप्रेस, हसन-सोलापूर-हसन, सोलापूर-यशवंतपूर, मुंबई-भुनेश्वर कोणार्क, उद्यान एक्सप्रेस आदी गाड्या विद्युत इंजिनद्वारे वाडीकडे विजेवर धावण्यास सुरवात झाली आहे.
शुक्रवारपासून (ता.२८ जानेवारी) इलेक्ट्रिक इंजिनद्वारे हसन- सोलापूर, म्हैसूर- सोलापूर तर शनिवारपासून (ता. २९) सोलापूर- हसन, सोलापूर-म्हैसूर बसवा एक्सप्रेस, विद्युत इंजिनद्वारे चालविण्याचा निर्णय घेण्यात आला.
यापूर्वी वाडी येथे डिझेल इंजिन काढून विद्युत इंजिन जोडले जात होते. मात्र आता सोलापूर रेल्वे स्थानकावर इंजिन बदलले जात असल्याने जवळपास ३० मिनिटे वाचणार असल्याने प्रवाशांचा प्रवास जलद होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
गाडी क्रमांक ११३१२-११३११ हसन-सोलापूर-हसन डेली एक्स्प्रेस, सोलापूर-यशवंतपूर-सोलापूर आणि गाडी क्रमांक १७३०७-१७३०८ म्हैसूर-बागलकोट-म्हैसूर बसवा एक्स्प्रेस, म्हैसूर-सोलापूर-म्हैसूर दरम्यान इलेक्ट्रिक इंजिनवर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी ही गाडी डिझेल इंजिनद्वारे म्हैसूर ते सोलापूरपर्यंत धावत होती.
चालू आर्थिक वर्ष २०२१- २२ मध्ये इलेक्ट्रिक इंजिनसह धावण्यासाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्शनमध्ये रूपांतरित केल्या गेल्या आहेत. बसवा एक्सप्रेस आता म्हैसूर, केएसआर, बेंगळुरू, धर्मावरम, गुंटकल, रायचूर, वाडी, कलबुर्गी व सोलापूर या ७६ टक्के मार्गावर इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हने धावणार आहे.
हसन-सोलापूर-हसन एक्स्प्रेस तिच्या ८२६ किमीच्या प्रवासापैकी ७८ टक्के मार्गावर म्हणजेच ६५२ किमी अंतर यशवंतपूर, धर्मावरम, गुंटकल, रायचूर, वाडी, कलबुर्गी आणि सोलापूरदरम्यान विद्युत इंजिनद्वारे धावणार आहे.
चार गाड्या इलेक्ट्रिकल इंजिनसह मार्गाच्या मोठ्या भागासाठी चालविल्यास दररोज १० हजार लिटरहून अधिक डिझेलची बचत होण्यास मदत होणार आहे. पुढील दोन महिन्यात कमीत कमी आणखी १० गाड्या इलेक्ट्रिक इंजिनवर स्विच करण्यासाठी सक्रियपणे काम केले जात आहे.
जेथे विद्युतीकरण आधीच पूर्ण झाले आहे अशा विभागांवर विशेष लक्ष केंद्रित केले जात आहे. दहा वर्षांपासून विद्युतीकरणाचे काम १६ एप्रिल १८५३ रोजी पहिली रेल्वे बोरी बंदर (मुंबई) ते ठाणे दरम्यान ३४ किमी अंतरावर धावली. त्यानंतर ता. ३ फेब्रुवारी १९२५ साली पहिली विजेवरील रेल्वे धावली.
सोलापूर विभागात २०१२ पासून विद्युतीकरणाचे काम सुरु आहे. विभागात विजेवरील रेल्वे सुरू होण्यास तब्बल ९१ वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. अखेर, उशिरा का होईना विजेवरील रेल्वे धावण्यास सुरवात झाल्याने सोलापूरकरांचे स्वप्न पूर्ण होताना दिसून येत आहे.
ठळक बाबी
दररोज १० हजार लिटर डिझेलची होणार बचत
येत्या दोन महिन्यात किमान दहा आणखी रेल्वेगाड्या इलेक्ट्रिक इंजिनवर धावणार
प्रवाशांचा प्रवास होणार आणखी जलद
वायू आणि ध्वनी प्रदूषण रोखून पर्यावरणास मदत डिझेल वापराची बचत होवून कार्बन उत्सर्जनात घट होईल
दरवर्षी ५.२५ कोटी रुपयांची होणार बचत

0 Comments