शेकापचे ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आज सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन
सांगोला (प्रतिनिधी) :महाराष्ट्रातील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ राजकीय नेते प्रा. एन. डी. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवार दि ३० जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता पंचायत समिती बचत भवन सांगोला येथे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष भाई डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ राजकीय नेते, विचारवंत, परिवर्तनवादी चळवळीचे मार्गदर्शक, सीमा भागातील जनतेचे नेते प्रा. भाई. एन. डी. पाटील यांचे सोमवार दि. १७ जानेवारी रोजी वयाच्या ९४ व्या वर्षी दुःखद निधन झाले. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे राजकीय मानसपुत्र ही त्यांची ठसठशीत भावमुद्रा होती. भाई एन. डी. पाटील म्हणजे महाराष्ट्राचे एक शिक्षकी मुक्त विद्यापीठ होते.
गेली सात दशके अविश्रांतपणे भारतीय संविधानाच्या सरनाम्याला अभिप्रेत असलेल्या नवसमाज निर्मितीच्या कामांमध्ये भाई एन. डी. पाटील सर कार्य करीत होते. शुद्ध चरित्र समाज जीवनाच्या सर्व बाजूने सखोल अभ्यास करण्याची वृत्ती तत्त्वज्ञानाशी आणि विचारसरणीशी अतूट बांधिलकी त्यागी आणि समर्पित जीवन वृत्ती ही त्यांची जीवनमूल्ये होती.
शेतकरी कामगार व शोषित जनतेशी बांधिलकी स्वीकारून त्यांच्या कल्याणासाठी अपार कष्ट त्यांनी उपसले. अशा या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी पंचायत समिती बचत भवन सांगोला येथे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वपक्षीय नेतेमंडळी, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे. असे आवाहन पुरोगामी युवक संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष भाई बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.

0 Comments