लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर सुशीलकुमार शिंदेंचे दौरे कमी ! राज्याच्या सत्तेत काँग्रेसचाही सहभाग असतानाही मंत्र्यांनी केवळ धावते दौरेच केले .
सोलापूर : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे
यांनी निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट केले.त्यांचे जिल्ह्यातील दौरेही कमी झाले. आमदार प्रणिती शिंदे यांनीही ग्रामीणकडे पुरेसे लक्ष दिले नाही. राज्याच्या सत्तेत कॉंग्रेसचाही सहभाग असतानाही मंत्र्यांनी केवळ धावते दौरेच केले. जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही वेळ मिळाला नाही. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना शब्द दिलेले जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील , शहराध्यक्ष प्रकाश वाले हे तोंडघशी पडले. वरिष्ठ नेत्यांच्या आश्वासनानंतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास जागवतो, हा अनुभव आहे. परंतु, तसे होत नसल्याने जिल्ह्यातील कॉंग्रेसचा वाली कोण, असा प्रश्न पदाधिकारी, कार्यकर्ते विचारू लागले आहेत. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन दोन वर्षे उलटूनही त्या प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने अनेकजण पक्षांतर करून दुसऱ्या पक्षात जाऊ लागले आहेत.
महापालिकेवरील सत्तेसाठी कॉंग्रेसचा मार्ग खडतर मानला जात आहे. शहरात कॉंग्रेस हाच सर्वात मोठा पक्ष, अशी वल्गना करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाला पडणाऱ्या खिंडाराकडे मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे. महापालिकेवरील सत्तेच्या माध्यमातून कॉंग्रेसने अनेकांना संधी देऊन मोठी पदे दिली. शेकडो नगरसेवकही झाले. मात्र, सध्या कॉंग्रेसच्या कोणत्याही कार्यक्रमात ठरावीक व्यक्तींशिवाय कोणीच दिसत नाही. आमदार प्रणिती शिंदे यांचा एकाकी लढा सुरू असतानाच पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर प्रदेशची जबाबदारी सोपविल्याने त्यांनाही पुरेसा वेळ देता येत नाही. पक्षाचे संघटन विस्कटू लागल्याने बदलाचे वारे ओळखून अनेकजण राष्ट्रवादी कॉंग्रेसशी जवळिकता साधू लागले आहेत.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील कॉंग्रेसची वाटचाल सुरळीत सुरू होती. मात्र, ऍड. शरद बनसोडे आणि डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी या नव्या उमेदवारांकडून पराभव पत्कारावा लागल्याने ते राजकारणातून अलिप्त झाल्याचीही चर्चा आहे. 'गाव तिथे शाखा' आणि 'कॉंग्रेस मनामनात अन् घराघरात' हे उपक्रम केवळ शहरातील काही प्रभागांपुरतेच मर्यादित राहिले असून ग्रामीणमध्ये त्याची सुरवातदेखील झालेली नाही. त्यामुळे चाचपडणारे पदाधिकारी, कार्यकर्ते आता दुसऱ्या पक्षाच्या वळचणीला जाऊ लागल्याचेही बोलले जात आहे.
कॉंग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी कॉंग्रेसला रामराम करून शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. त्यामुळे ऐनवेळी कॉंग्रेसने नगरसेवक बाबा मिस्त्री (Baba Mistri) यांना उमेदवारी दिली. या मतदारसंघात त्यांची ताकद एवढी मोठी नसतानाही त्यांनी माजीमंत्री सुभाष देशमुख यांना घाम फोडला. परंतु, कॉंग्रेसला हा जनाधार टिकवता आला नाही आणि दुसरीकडे मिस्त्री हे पुन्हा महापालिका आणि सिव्हिल हॉस्पिटलपुरतेच मर्यादित राहिले. त्यामुळे आता दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचा आगामी उमेदवार कोण, या प्रश्नाचे उत्तर शोधताना अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी सुरू केल्याची चर्चा आहे.
शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी कॉंग्रेसची धडपड सुरू आहे. परंतु, अंतर्गत वादामुळे शहराध्यक्ष प्रकाश वालेंना नियोजन करणे जमत नसल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाजाची निर्णायक ताकद आहे. प्रत्येक निवडणुकीला 'भाईजान'चा कित्ता गिरवणाऱ्या कॉंग्रेसला आगामी निवडणूक कठीण जाणार आहे. एमआयएमचीही ताकद वाढत आहे. त्या पक्षातील तौफिक शेख यांच्यासह काही नगरसेवक राष्ट्रवादीत गेल्याने राष्ट्रवादीचीही ताकद वाढली आहे.
तर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक ऍड. बेरिया यांनीही राष्ट्रवादीची वाट धरली असून भाजप, शिवसेननेही मतदारसंघातील ताकद वाढविण्यासाठी कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांना महापालिकेवरील सत्तेचे स्वप्न अपूर्ण राहील, या चिंतेतून काही पदाधिकाऱ्यांनी आता शिवसेना व राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरूनच प्रयत्न करण्याचा सल्ला दिल्याचेही बोलले जात आहे.

0 Comments