भ्रष्टाचाराचा अड्डा बनली ZP ! विरोधी पक्षनेते बळिराम साठेंचा आरोप पूर्वीची आणि आताची झेडपी , यात खूप फरक झाला असून पैसे दिल्याशिवाय कामेच होत नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते बळिराम साठे यांनी केला आहे .
सोलापूर जिल्हापरिषद भ्रष्टाचाराचा अड्डा !
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद हा भ्रष्टाचाराचा अड्डा बनला असून येथे पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही असा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांनीच केला आहे त्यामुळे जिल्हा परिषद वर्तुळात बरीच खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषदेतील कामे सहजासहजी होत नाहीत अशा तक्रारी नेहमीच सुरु असतात आणि आपली कामे कशी करून घ्यायची याची चर्चा सुरु असते. विशेषतः ठेकेदार मंडळीतील आपापसातील अशी चर्चा अधिक रंजक असते. नुकतीच जिल्हा परिषद कार्यालयात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला आणि या सापळ्यात भ्रष्टाचाराचा एक स्वामी अलगद सापडला त्यामुळे तर जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचारावर अधिक चर्चा होऊ लागली आहे. बसवराज स्वामी याला नुकतेच लाच घेताना पकडण्यात आले आहे त्यामुळे येथे काय चालते यावर शिक्कामोर्तबच झाला आहे. या स्वामीची चर्चा अजून सुरु असतानाच विरोधी पक्षनेत्याने मोठे विधान केले आहे त्यामुळे तर सोलापूर जिल्हा परिषद बदनामीच्या विळख्यात सापडली आहे.
लाच घेताना रंगेहात सापडलेल्या स्वामीबाबत बोलताना विरोधी पक्ष नेते बळीराम साठे यांनी सांगितले की, या बसवराज स्वामी याला यापूर्वी दोनदा वॉर्निंग दिली होती. पूर्वीची जिल्हा परिषद आणि आत्ताची जिल्हा परिषद यात खूप मोठा फरक आहे. आत्ता पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही, लोकहिताची कामे करताना जाणीवपूर्वक अडवणूक करून लाच मागितली जाते. जनतेचा सर्वाधिक संपर्क होणाऱ्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित विभागात सर्वाधिक भ्रष्टाचार होतो असे लाचलुचपत विभागाचे निरीक्षण आहे. लाच प्रकरणात पोलीस. महसूल, जिल्हा परिषद अव्वल आहे. बांधकाम विभागातही हा प्रकार अधिक दिसून येतो. गेल्या काही काळात याच विभागातील अधिकारी, कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकलेले आहेत. त्यात आता सोलापूर जिल्हा परिषद चर्चेत असताना विरोधी पक्षनेत्यांनीच मोठा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.
0 Comments