आरक्षित डब्यात ना मास्क , ना फिजिकल डिस्टन्स
सोलापूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली आहे. प्रशासनाकडून मेल, एक्सप्रेससह पॅसेंजर गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढली आहे.मात्र, रेल्वेकडून पॅसेंजरसह एक्सप्रेस गाड्या चालविल्या जात आहेत. या गाड्यांमध्ये कोरोना नियमांचे पालन करणे अनविार्य असले, तरी प्रवाशंकडून मात्र मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसून येत नसल्याचे 'सकाळ'ने केलेल्या पाहणीत दिसून आले.
दक्षिणेचे प्रवेशद्वार म्हणून सोलापूर रेल्वे स्थानकास ओळखले जाते. त्यामुळे दररोज ५५ ते ६० प्रवासी रेल्वे गाड्या ये-जा करीत असतात. कोरोना काळात केवळ विशेष एक्सप्रेस चालविण्यात येत होत्या. मात्र, अनलॉक आणि निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आल्याने रेल्वेकडून पॅसेंजर गाड्या देखील सुरु करण्यात आल्या आहेत. सध्या सुरू असलेल्या गाड्यांतून प्रवाशांकडून फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क लावणे यासारख्या महत्त्वाच्या नियमांचे पालन होते किंवा नाही याची पाहणी केली असता अनेकांकडून नियमांचे उल्लघंन होत असल्याचे दिसून आले. फलांटावर सर्व नियमांच्या अंमलबजावणीवर लक्ष दिले जात असले, तरी चालू गाडीमध्ये नियमांचे पालन होताना दिसून येत नाही. याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
नियमांची अंमलबजावणी आवश्यक
रेल्वे स्थानक परिसरात कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोर अंमलबजावणी होते. याठिकाणी तिकीट तपासणी, मास्क, आदींबाबत सूचना दिल्या जातात. मात्र, प्रवासी एकदा गाडीत बसले की, नियमांचा फज्जा उडतो. विशेषतः बैठक संरचना असलेल्या डब्यांमध्ये नियमांना बगल दिली जाते. यासंदर्भात पाहणी केली असता, बेंगलुरु -मुंबई उद्यान एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांच्या तोंडावर मास्क नव्हता. गाड्यामध्ये असलेल्या टीसी व रेल्वे पोलिसांकडून कारवाई होणे अपेक्षित आहे. परंतु त्यांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. ही बेफिकीरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेस आमंत्रण देण्यास कारणीभूत ठरु शकते.
या गाड्या आहेत सुरु
सोलापूर-मुंबई सिद्धेश्वर एक्सप्रेस, सोलापूर-पुणे हुतात्मा एक्सप्रेस, मुंबई-बेंगलुरु उद्यान एक्सप्रेस, मुंबई-भुनेश्वर कोणार्क एक्सप्रेस, एलटीटी-चेन्नई एक्सप्रेस, मदुराई-एलटीटी एक्सप्रेस, चेन्नई-अहमदाबाद एक्सप्रेस, सोलापूर-हसन एक्सप्रेस, दादर-पंढरपूर एक्सप्रेस, साईनगर शिर्डी-दादर एक्सप्रेस, मुंबई-गदग एक्सप्रेस, लातूर-मुंबई एक्सप्रेस, सिकंदराबाद-राजकोट एक्सप्रेस. तर पॅसेजंरमध्ये पुणे-सोलापूर, सोलापूर-वाडी, दौंड/पुणे-निजामाबाद, कुर्डूवाडी-मिरज, पुणे-कोल्हापूर, पुणे-दौंड आणि निजामाबाद- पंढरपूर, पुणे-दौंड वन वे.
0 Comments