सोलापूर, तीन वर्षांनंतर वाळू लिलावास मुहूर्त
सोलापूर 10 नोव्हेंबर जिल्ह्यात तीन वर्षांनंतर अखेर वाळू लिलावास मुहूर्त मिळणार आहे. मोहोळ व मंगळवेढा तालुक्यातील ९ ठिकाणचे वाळू लिलाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे परवानगी मागितली आहे. पर्यावरण समितीच्या मंजुरीनंतर लिलावाचा मार्ग मोकळा होणार आहे. नोव्हेंबरअखेर जिल्हा प्रशासनाकडून लिलावाची प्रक्रिया सुरू करण्याची दाट शक्यता आहे.
जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून वाळू लिलाव नसल्याने परराज्यातील वाळू जिल्ह्यात विक्रीसाठी येत आहे. शिवाय अनेक बांधकामांसाठी सॅण्ड डस्ट वापरली जात आहे. वाळूचा तुटवडा असल्याने नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूची चोरीही सुरू आहे. यंदा प्रशासनाने मागील वर्षी सादर केलेल्या ९ ठिकाणच्या प्रस्तावांना पुन्हा मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केले आहेत. या प्रस्तावास मंजुरी मिळताच लिलावाचा मार्ग मोकळा होणार आहे. नदीपात्रातील पाणी कमी झाल्यानंतर इतर ठिकाणच्या वाळू लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागवणे, शासनाला सादर करणे, शासनाची मंजुरी घेऊन लिलावाची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
0 Comments