महाराष्ट्रासह ‘या’ राज्यांमध्ये पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता, पुढचे ४ दिवस धोक्याचे
देशात हलक्या थंडीला सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी थंडीबरोबरच धुके पडू लागले आहे. पण दक्षिणेकडील राज्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दक्षिण अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे ३० नोव्हेंबरपासून तामिळनाडूमध्ये पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. मात्र तोपर्यंत तामिळनाडूसह इतर दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ, माहे, लक्षद्वीप, किनारी आंध्र प्रदेश, यानम आणि रायलसीमा भागात पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यानंतर इथे पावसाची तीव्रता कमी होईल. २९ नोव्हेंबरपर्यंत तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो, असेही हवामान खात्याने म्हटले आहे. तर दुसरीकडे, २८ नोव्हेंबर रोजी दक्षिण किनारपट्टी आंध्र प्रदेश आणि रायलसीमा येथे मुसळधार पाऊस पडू शकतो. २८ आणि २९ नोव्हेंबरला केरळ आणि माहेमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रातही पावसाची शक्यता
यासोबतच ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि गुजरातच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. यादरम्यान या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. २९ नोव्हेंबर रोजी अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे अंदमान आणि निकोबारमध्ये ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर रोजी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दुसरीकडे, काश्मीरमध्ये बहुतांश ठिकाणी किमान तापमानात सुधारणा झाली असून, श्रीनगरमधील तापमानात नागरिकांना थंडीपासून थोडासा दिलासा मिळाला आहे. दक्षिण काश्मीरमधील कोकरनाग वगळता उर्वरित खोऱ्यात रात्रीच्या तापमानात सुधारणा झाली आहे. तरीही, श्रीनगर शहर हे एकमेव ठिकाण राहिले जेथे पारा गोठणबिंदूच्या वर राहिला.
0 Comments