सोलापूर : लसीच्या प्रमाणपत्राशिवाय डिसेंबरचा मिळणार नाही पगार
सोलापूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर पुन्हा कोरोना वाढणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. गावोगावी लसीकरण केंद्रे सुरु करून 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण केले जात आहे. तरीही, जिल्ह्यातील 11 लाख 10 हजार व्यक्तींनी लस टोचलेली नाही. या पार्श्वभूमीवर आता अशा व्यक्तींना ग्रामपंचायतींमधून कोणताही दाखला मिळणार नाही. दुसरीकडे शासकीय कर्मचाऱ्यांना पगारपत्रकासोबत लसीचे प्रमाणपत्र जोडावे लागणार असून त्याशिवाय त्यांना डिसेंबरचा पगार दिला जाणार नाही,
असे आदेश झेडपीचे सीईओ दिलीप स्वामी यांनी काढले आहेत.देशभरात कोरोनावरील प्रतिबंधित लसीकरण फेब्रुवारीपासून सुरु झाले आहे. राज्यातील 18 वर्षांवरील जवळपास 10 कोटी व्यक्तींनी लस टोचणे अपेक्षित असून त्यात सोलापूर जिल्ह्यातील 43 लाख 80 हजार व्यक्तींचा समावेश आहे. मागील साडेआठ महिन्यानंतरही सोलापूर ग्रामीणमधील साडेआठ लाख तर शहरातील अडीच लाखांहून अधिक व्यक्तींनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही. कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 84 दिवसांनी दुसरा तर कोवॅक्सिन लस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस घेणे आवश्यक आहे. तरीही, अंदाजित एक लाखांहून अधिक व्यक्ती दुसरा डोस घेण्यासाठी आल्याच नाहीत, हे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी त्यांच्यावर कडक निर्बंध घालण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.
प्रवास व दुकानात जाण्यासाठी प्रमाणपत्राचे बंधन
दिवाळीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल, असा वर्तविण्यात आला आहे. तत्पूर्वी, सर्वांचेच लसीकरण व्हावे म्हणून गावागावातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, शहरातील नागरी आरोग्य केंद्रे, महाविद्यालयांच्या ठिकाणी लसीकरण कॅम्प आयोजित केले जात आहेत. तरीही, बहुतेकजण कोरोना गेला, लस टोचल्यावर काहीतरी होईल, या गैरसमजतीतून लस टोचून घेत नाहीत. त्यामुळे आता प्रवास करताना संबंधितांकडे लस टोचल्याचे प्रमाणपत्र नसल्यास त्यांना दंड भरावा लागेल अथवा त्यांना प्रवास करता येणार नाही. तसेच दुकानांमध्ये प्रवेश करताना त्यांना प्रमाणपत्र दाखवावे लागेल, अन्यथा दुकानात जाता येणार नाही, असे निकष लावले जातील, असेही सीईओ स्वामी यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला प्रस्ताव
प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना कोरोनाचा धोका खूपच कमी आहे. सर्वजण सुरक्षित राहावेत म्हणून 18 वर्षांवरील सर्वांना प्रतिबंधित लस टोचावी, असे आवाहन करूनही काहीजण लस टोचून घेत नाहीत. त्यांच्यावर कडक निर्बंध घातले जाणार आहेत.
0 Comments