मद्यधुंद चालकाचा निष्काळजीपणा! गॅस टँकर दुकानांत घुसला
महूद (सोलापूर) - मद्यधुंद गॅस टँकर चालकाने निष्काळजीपणे व भरधाव वेगाने टँकर चालवून टँकर रस्त्याच्या कडेला असलेल्या तीन दुकानांच्या गाळ्यांमध्ये भिंती पाडून आत घुसवल्यामुळे दुकानाातील मालाचे व दुकानाचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. हा अपघात महूद येथील पंढरपूर ते दिघंची रस्त्यावर शनिवार (ता. 20) रोजी रात्री साडेनऊ ते पावणे दहाच्या दरम्यान घडला आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.मात्र हा टँकर रिकामा असल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
याबाबत महूद येथील अनिल बाबुराव सरतापे यांनी सांगोला पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, शनिवार (ता. 20) रोजी रात्री साडेनऊ ते पावणे दहाच्या सुमारास पंढरपूर ते दिघंची मार्गाने जाणारा एच. पी. गॅस कंपनी चा टँकर क्रमांक एम. एच. 43, बी. जी. 2326 हा गॅस टँकर सोलापूर येथे गॅस खाली करून पंढरपूर-तासगाव मार्गे हजारवाडी येथे भरधाव वेगाने निघाला होता. भरधाव वेगाने निघालेला हा टँकर महूद येथील पंढरपूर ते दिघंची रस्त्यालगत असणार्या अनिल बाबुराव सरतापे यांच्या सायकल दुरुस्तीच्या दुकानात घुसला. अनिल सरतापे यांचे सायकल दुरुस्तीचे दुकान पुर्णपणे तोडून हा टँकर बाजूच्या दादासाहेब सरतापे यांच्या मालकीच्या तर रणजित बाबर हे चालवत असलेल्या किराणा दुकानाची भिंत तोडून बाजूच्या नितीन सरतापे यांच्या मालकीच्या व अतुल कांबळे हे चालवत असलेल्या मोबाईल दुकानात घुसला. भरधाव टॅंकर तीन गळ्यामध्ये घुसल्याने दुकानातील सामानाची मोठ्या प्रमाणावर मोडतोड होऊन पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
मद्यधुंद चालकाचा निष्काळजीपणा! गॅस टँकर दुकानांत घुसला
यावेळी झालेल्या मोठ्या आवाजाने आजूबाजू लोक जमा झाले. टँकरच्या केबिनमध्ये अडकलेल्या दिलीप पुंडलिक भेंडेकर (वय 28, रा. राणेगाव, ता. धारणी, जि. अमरावती) यास बाहेर काढले.यावेळी त्याच्या तोंडून दारुचा वास येत होता. भरधाव वेगाने वाहन चालवून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केला. तसेच खाजगी मालमत्तेचे नुकसान केले म्हणून संबंधित वाहन चालकाच्या विरोधात सांगोला पोलिसांमध्ये कलम 279, 336 ,427, 184 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नागरिकांनी वाहनचालकास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुहास जगताप हे करत आहेत.
1) सायकल दुकानदार अनिल सरतापे हे चालवत असलेल्या दुकानाच्या ठिकाणीच राहतात रात्री झोपण्यापूर्वी ते लघवी साठी बाहेर गेले असताना टॅंकर दुकानात घुसला. केवळ दैव बलवत्तर म्हणून ते वाचले आहेत. तर शेजारील किराणा दुकानदार व मोबाईल दुकान चालक आपली दुकाने नुकतीच बंद करून घराकडे गेली होती. त्यामुळे तेही या अपघातातून वाचले आहेत.
2) अपघातग्रस्त गॅस टॅंकर हा रिकामा होता. हा टँकर दुकानांच्या बाजूला असलेल्या वीजवाहक तारांच्या खांबाला घासून दुकानात घुसला आहे. टँकर रिकामा असल्याने पुढील मोठा अनर्थ टळला आहे.
3) पंढरपूर ते दिघंची हा नव्यानेच तयार करण्यात आलेला रस्ता अनेक ठिकाणी सदोष आहे. अनेक ठिकाणी या रस्त्याची रुंदी कमी-अधिक आहे. सदोष रस्त्यामुळे या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
4) महूद भागातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वाहन रस्त्याकडील घरात घुसण्याचा हा दुसरा प्रकार आहे. यापूर्वी महूद ते सांगोला रस्त्यावर मोठे वाहन रस्ता सोडून कडेच्या घरात घुसले होते.
0 Comments