स्तनांना कपड्यांवरुन स्पर्श असला तरी तो लैंगिक अत्याचारच नागपूर खंडपीठाचा निकाल सुप्रीम कोर्टाकडून रद्द
पॉक्सो कायद्यासंदर्भात नागपूर खंडपीठाच्या वादग्रस्त निकालाला सुप्रीम कोर्टानं रद्दबातल ठरवलं आहे . निर्वस्त्र न करता स्तनांना स्पर्श म्हणजे लैंगिक अत्याचार नव्हे असं म्हणत नागपूर खंडपीठानं एका बाल लैंगिक शोषणात धक्कादायक निकाल दिला होता . मात्र लैंगिक उद्देशानं केलेला कुठलाही स्पर्श हा यौनशोषणच असं म्हणत सुप्रीम कोर्टानं आरोपीला पुन्हा पॉक्सो कलमाच्याच अंतर्गत दोषी ठरवलं आहे . लैंगिक शोषणाची व्याख्या कपड्यांमध्ये गुंडाळणाच्या मुंबई हायकोर्टाच्या वादग्रस्त निकालाला अखेर सुप्रीम कोर्टानं रद्दबातल ठरवलंय . लैंगिक भावनेतून केलेला कुठलाही स्पर्श , मग तो कपड्यांवरून असला तरी यौन शोषणच ठरतो असं म्हणत सुप्रीम कोर्टानं हा ऐतिहासिक निकाल दिलाय . स्पर्श कपडयांवरुन आहे की स्कीन टू स्कीन यावरुन खल करत बसलो तर पॉक्सो कायद्याचा उद्देशच बाजूला पडेल असं म्हणत सुप्रीम कोर्टानं
याबाबत कठोर टिपण्णीही केलीय . लहान मुलांचं लैंगिक शोषण रोखण्यासाठी केंद्र सरकारनं एका अर्थात पॉस्को कायदा आणला . १२ वर्षांच्या मुलीचे स्तन ३ ९ वर्षांच्या एका पुरुषानं बंद खोलीत दाबल्यानंतर याबाबत गुन्हा दाखल झाला . सत्र न्यायालयानं व्यक्तीला पॉक्सो कायद्यांतर्गत दोषी ठरवलं , पण मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाकडे ही केस आल्यावर त्यांनी निर्वस्त्र न करता स्तनांना स्पर्श म्हणजे लैंगिक अत्याचार नव्हे असं म्हटलं होतं , ही केवळ विनयभंगाची केस ठरते असं म्हटलं होतं . पॉक्सो कायद्यातली कलमं नागपूर
खंडपीठानं हटवल्यानं या व्यक्तीला ३ वर्षांऐवजी केवळ १ वर्षांचाच तुरुंगवास होत होता . पण आज सुप्रीम कोर्टानं हा वादग्रस्त निकाल रद्दबातल ठरवला , आणि या केसमध्ये पुन्हा पॉक्सो कायदयातलीच कलमं लागू केली आहेत . नागपूर वादग्रस्त निकाल न्यायाधीश पुष्पा गनेडीवाला यांनी दिला होता . आज सुप्रीम कोर्टात न्या . उदय ललित , न्या . रविंद्र भट्ट आणि न्या . बेला त्रिवेदी यांच्या खंडपीठानं हा निकाल रद्दबातल खंडपीठाचा ठरवला . पॉक्सो कायद्यात स्पर्श किंवा लैंगिक संबंधांची व्याख्या स्पष्टपणे नाहीय . पण स्पर्श कपड्यांवरुन झालेला आहे की निर्वस्त्र करुन याबाबत खल करुन कायद्याच्या मूळ
उद्देश्याला हरताळ बसला नाही पाहिजे असं मत सुप्रीम कोर्टानं नोंदवलं . लैंगिक भावनेच्या उद्देशानं झालेला कुठलाही स्पर्श हा यौन शोषणच ठरतो असा महत्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टानं दिला आहे . नागपूर खंडपीठाच्या निकालाविरोधात महाराष्ट्र सरकार , केंद्र सरकार आणि राष्ट्रीय महिला आयोग या सर्वांनीच सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती . विशेष म्हणजे या केसमध्ये सुप्रीम कोर्टातले दोन सख्खे भाऊ बहीण एकमेकांच्या विरोधात लढत होते . अॅडव्होकेट सिद्धार्थ लुथरा हे आरोपीच्या बाजूनं तर त्यांची सख्खी बहीण सिनियर अॅडव्होकेट गीता लुथरा ही राष्ट्रीय महिला आयोगाच्या बाजूनं केस लढल्या . कायदे कितीही कडक असले तरी अनेकदा त्यातल्या पळवाटा शोधून गुन्हेगार मोकाट सुटतात . नागपूर खंडपीठाच्या निकालानं अशीच मोकळी वाट लहानग्यांचं यौन शोषण करणाऱ्यांना उपलब्ध करुन दिली होती . पण आता देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं हा अन्याय दूर करत याबाबत कठोर निर्णय दिला आहे .
0 Comments