मागण्यांसाठी आंदोलन खरेदी - विक्री व्यवहार खोळंबल्याने नागरिकांना मनस्ताप नोंदणी व मुद्रांकचे अधिकारी , कर्मचारी संपावर ; दीड कोटी रुपयांचा महसूल ठप्प
नोंदणी व मुद्रांक विभागातील अराजपत्रित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे . यामुळे जिल्ह्यातील १७ नोंदणी कार्यालयांतील दस्त नोंदणी पूर्णपणे बंद होती . संपामुळे शासनाचा दीड कोटी रुपयांचा महसूल ठप्प झाला आहे . वारंवार शासनाकडे पाठपुरावा करूनही मागण्या मान्य होत नसल्याने संघटनेने बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे . नोंदणी व मुद्रांक विभागातील अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या वतीने सर्व संवर्गातील ५ ते ६ वर्षांपासून रखडलेली पदोन्नती करण्याची प्रमुख मागणी आहे . शासनाला दिलेल्या निवेदनावर अध्यक्ष गजानन खोत , कार्याध्यक्ष अशोकराव चव्हाण , सचिव सागर पवार , जिल्हाध्यक्ष के . पी . कन्ना यांच्या सह्या आहेत .
या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक , लिपीक यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला .शासनाला दिलेल्या निवेदनात पदोन्नतीची कार्यवाही पूर्ण झाल्याशिवाय नवीन सेवा प्रवेश नियम लागू न करणे , विभागातील सर्व रिक्त पदे तत्काळ भरणे , वरिष्ठ लिपीक , कनिष्ठ लिपीक यांच्या ज्येष्ठता याद्या २०१८ पासून प्रलंबित आहेत , त्या अंतिम करणे , मुंबई शहरातील मुद्रांक जिल्हाधिकारी पद विभागातील पदोन्नतीने भरणे , कोरोनामुळे मृत्यू झालेल्या अधिकारी , कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना तत्काळ ५० लाखांची मदत करणे , कुटुंबातील एका व्यक्तीस अनुकंपा तत्त्वावर नोकरीत घेणे , तुकडेबंदी , रेरा कायद्यानुसार नोंदणी विभागातील अधिकारी , कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेणे , सह दुय्यम निबंधक वर्ग २ व दुय्यम निबंधक श्रेणी १ संवर्गाचे एकत्रीकरण करणे , पदनामात बदल , खात्याची विभागीय परीक्षा प्रत्येक वर्षी घेणे या मागण्या आहेत .


0 Comments