अक्कासाहेबच विधानसभेचा उमेदवार ठरवतील ; इतरांनी आमच्यात डोकाऊ नये
शेतकरी कामगार पक्षाच्या राज्यस्तरीय मध्यवर्ती समितीच्या दोनदिवसीय अधिवेशनाचा रविवारी सांगोल्यात समारोप झाला. यावेळी उपस्थित शेकाप पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केले.व्यासपीठावर रतनताई देशमुख, चिटणीस मंडळाचे सदस्य एस. व्ही. जाधव, चंद्रकांत देशमुख, डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख, प्रा. नानासाहेब लिगाडे, सभापती गिरीश गंगथडे, माजी नगराध्यक्ष मारुती बनकर, उद्योगपती बाळासाहेब एरंडे, माजी सभापती बाळासाहेब काटकर, झेडपी सदस्य सचिन देशमुख, दादाशेठ बाबर, सभापती राणी कोळवले, उपसभापती नारायण जगताप, बाळासाहेब झपके आदी उपस्थित होते.
आमदार जयंत पाटील म्हणाले की, आबासाहेबांएवढी निश्चितच माझी उंची मोठी नाही; परंतु त्यांच्या निधनानंतर सांगोल्यातील कार्यकर्त्यांसह सर्व कामकाज पाहण्याची जबाबदारी माझी आहे. विधिमंडळ असो वा सरकारी कामे, ती पूर्ण केली जातील. त्यांची उणीव भासू देणार नाही. यापुढे प्रत्येक कार्यकर्त्याने नेता समजून काम करावे. अक्कासाहेब जो निर्णय घेतील तो सर्वमान्य असेल, असे त्यांनी सांगितले.
टेंभू, म्हैसाळ, नीरा उजवा कालवा पाण्याचे श्रेय विरोधक घेत असले तरी यासाठी स्व. गणपतराव देशमुख यांनी मोठा संघर्ष केला आहे. त्यामुळे शेकापच्या कार्यकर्त्यांनी नाराज होण्याची गरज नाही. कोण किती टक्केवारी घेतो तेही बघू, अजून निवडणुकांना तीन वर्षांचा कालावधी आहे, असे म्हणत त्यांनी विरोधकांचाही खरपूस समाचार घेतला.
यावेळी चंद्रकांत देशमुख, माजी आमदार धैर्यशील पाटील, एस. व्ही. जाधव, बाबासाहेब करांडे, ॲड. सचिन देशमुख, ॲड. बंडू काशीद यांनी विचार व्यक्त केले. जिल्हा बँकेचे संचालक चंद्रकांत देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले.
पदाधिकाऱ्यांचेही टोचले कान
आमदार जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना विरोधकांवर टीका-टिपणी केली. त्याचवेळी शेकापचे प्रा. नानासाहेब लिगाडे, जिल्हा परिषद सदस्य सचिन देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख, उद्योगपती बाळासाहेब एरंडे आदी पदाधिकाऱ्यांचेही कान टोचल्याने बैठकस्थळी चांगलाच हशा पिकला. शेकापच्या राज्यस्तरीय मध्यवर्ती समितीच्या दोनदिवसीय अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी आमदार जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर रतनताई देशमुख व अन्य.
0 Comments