माळशिरस तालुका हा मोहिते-पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मोहिते-पाटील यांची ही ताकद आता भाजपच्या मागे उभा आहे.
नातेपुते (सोलापूर) : माळशिरस तालुका हा मोहिते-पाटील यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मोहिते-पाटील यांची ही ताकद आता भाजपच्या मागे उभा आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेससाठीही हा तालुका महत्त्वाचा असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. आता कॉंग्रेसनेही माळशिरस तालुक्याला महत्त्व दिल्याचे दिसून आले आहे. डॉ. धवलसिंह मोहिते- पाटील यांच्याकडे कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाची धुरा दिली आहे. तर माजी आमदार रामहरी रूपनवर यांना प्रदेश उपाध्यक्ष पदावर संधी दिली आहे. त्यामुळे माळशिरस तालुका आता सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे.
राजकीय समीकरणे जुळवत राष्ट्रवादी नंबर वन होण्याच्या तयारीत!
सहकार महर्षी कै. शंकरराव मोहिते-पाटील यांच्या पश्चात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, कै. प्रतापसिंह मोहिते- पाटील यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली सलग पंचवीस वर्षे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू अकलूज राहिलेला होता. काळाच्या ओघात या बंधूंमध्ये राजकीय तेढ निर्माण झाला आणि एकाच कुटुंबात दोन राजकीय पक्ष आले. सध्या शिवरत्न बंगला भाजपमय झाला आहे. डॉ. धवलसिंह मोहिते- पाटील यांचा शिवसेना मार्ग आता कॉंग्रेसमध्ये आल्याने प्रतापगड कॉंग्रेसमय झाला आहे. तसेच तालुक्यातील मोहिते-पाटील यांना परंपरागत विरोधक असणारे अनेक जण उत्तमराव जानकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणारा गट राष्ट्रवादीमध्ये सक्रिय आहे. राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांना मोहिते- पाटील यांनी भाजपमध्ये जाणे रुचले नाही. त्यामुळे मोहिते- पाटील हे आता राष्ट्रवादीचे लक्ष्य आहेत.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील यांच्या एकमेव संपर्कामुळे तालुक्यातील तमाम जनता मोहिते- पाटील परिवार व भाजपच्या पाठीशी आजही आहे. त्याचा परिणाम म्हणजे लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार विजयी झाला. प्रदेश नेतृत्वाने माळशिरस तालुक्यावर मोठी जबाबदारी दिलेली असली तरी पूर्वीसारखे कार्यकर्ते आणि जनता नेतृत्वाशी एकनिष्ठ राहिलेली नाही. केंद्रात भाजप आहे, राज्यात पुन्हा भाजप सत्तेत येऊ शकतो. या सर्वांचा फायदा भाजपला म्हणजेच शिवरत्न बंगल्याला मिळणार आहे. त्यादृष्टीने या सर्वांना काम करावे लागणार आहे.
'या' निवडणुकीतील विजयानंतर प्रणिती शिंदेंना मंत्रिपद?ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे राज्यातील सत्तेतून अनेक कामे सहज होऊ शकतात. त्यामुळे उत्तमराव जानकर यांच्या अवतीभोवती कार्यकर्त्यांचा मोठा गराडा आहे. याआधी माहिते-पाटील परिवार राष्ट्रवादीसोबत होता. त्यामुळे बहुतांशी तालुका राष्ट्रवादीमय होता. मात्र, आज ती परिस्थिती राहिलेली नाही. मात्र, पूर्वीचे दिवस परत आणण्यासाठी राष्ट्रवादीने माळशिरस तालुक्यात हळूहळू पावले टाकण्यास सुरवात केली आहे.
डॉ. धवलसिंह यांना अतिशय कमी वयात जिल्हाध्यक्षपद देऊन नेतृत्व सिद्ध करण्याची संधी कॉंग्रेसने दिली आहे. तसेच इतर पक्षांप्रमाणेच कॉंग्रेसनेही माळशिरस तालुक्यावर लक्ष केंद्रित केले आहे. डॉ. धवलसिंह यांना ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, माजी आमदार रामहरी रूपनवर, आमदार प्रणिती शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे हे मार्गदर्शनासाठी आहेत. तरीही जिल्ह्यात कै. प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या जुन्या सहकाऱ्यांना सोबतीला घेऊन कॉंग्रेस पक्ष वाढवावा लागणार आहे. पुरेसा वेळ द्यावा लागणार आहे.
सहकारी संस्थांची परिस्थिती भयावह
सहकार महर्षी शंकरराव मोहिते- पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये जिल्ह्यात सर्वांत जास्त सहकारी संस्था माळशिरस तालुक्यातील होत्या. त्या आर्थिकदृष्ट्या सुदृढ होत्या. यशवंतनगर, सदाशिवनगर येथील साखर कारखाने, शिवामृत दूध संघ, राज्यात सर्वात जास्त पक्षी असणारा राजहंस कुक्कुटपालन संघ, सुमित्रा, रत्नप्रभादेवी, धनश्री, विजय, गणेश या पतसंस्था जिल्ह्यातील जनतेचा मोठा आधार होत्या. मात्र, या सर्व संस्थांची आजची परिस्थिती भयावह आहे. अनेक संस्था दिवाळखोरीत निघालेल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांचा चांदापुरी साखर कारखाना व्यवस्थित न चालवला गेल्यामुळे त्यांच्या जवळचे मित्र दूर गेले आहेत. अनेकांच्या शेतीच्या सात-बारावर बॅंकांचा बोजा आहे.
0 Comments