आईवर विळ्याने हल्ला होताना धाकट्याला नाही बघवल; थरारक घटनेत थोरल्याचा खेळ खल्लास
माजलगाव, ०३ सप्टेंबर: थोरल्या भावाची हत्या करून त्यामुळे आत्महत्या केल्याचा बनाव रचणाऱ्या भावाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक सत्य समोर आले आहे. थोरला भाऊ आपल्या आईवर विळ्याने हल्ला करत असल्याचे पाहून धाकट्या भावाने थोरल्या भावाची निर्घृण हत्या केली आहे. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून धाकट्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. या हत्या प्रकरणात भावाला न्यायालयामध्ये हजर केले असता, न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास माजलगाव ग्रामीण पोलीस करत आहेत.
बापू ऊर्फ बाळासाहेब कदम असे हत्या झालेल्या थोरल्या भावाचे नाव आहे, तर गणेश कदम असे अटक केलेल्या धाकट्या भावाचे नावे आहे. दोघंही माजलगाव तालुक्यामधील मालीपारगाव याठिकाणी आपल्या आई वडिलांसोबत राहतात. दरम्यान घरगुती कारणातून थोरला भाऊ आईवर विळ्याने हल्ला करत होता. आईला होणारी मारहाण न बघवल्याने धाकट्याने थोरल्या भावाची पाठीमागून येऊन गळा आवळून हत्या केली आहे. यानंतर आरोपी भावाने मृत भावाचा मृतदेह घराच्या पाठीमागे ओसाड जागेत फेकून दिला होता.
मृत बापूने आत्महत्या केल्याचा बनाव धाकटा भाऊ गणेशने रचला होता. पण त्याचा हा बनाव फार काळ टिकला नाही. बापूच्या वडिलांनी खूनाच्या घटनेचा खुलासा केल्यानंतर आरोपी गणेशला अटक करण्यात आली आहे. लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. वडिलांच्या फिर्यादीवरून माजलगाव ग्रामीण पोलिसांनी बुधवारी रात्री उशीरा आरोपी भाऊ गणेश कदमला अटक केली आहे. दरम्यान आरोपीला गुरुवारी माजलगाव न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर मृत बापूच्या हल्ल्यात जखमी झालेल्या आईवर बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेचा पुढील तपास माजलगाव (majalgaon) पोलीस करत आहेत.
0 Comments