कॉंग्रेस महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार : या शहरात केली घोषणा
सोलापूर : सोलापूर महापालिकेची आगामी निवडणूक कॉंग्रेस पक्ष स्वबळावरच लढेल आणि तशी भूमिका प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना कळविण्यात आली आहे, अशी माहिती कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी दिली.सोलापूर महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने आता सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. मात्र, राज्यातील महाविकास आघाडी या निवडणुकीत दिसणार का, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. राष्ट्रवादीने संवाद यात्रेच्या माध्यमातून अप्रत्यक्षरित्या स्वबळाचा इशारा दिला आहे. शिवसेनेने यापूर्वी शिवसंपर्क अभियान राबविले. कॉंग्रेसने "कॉंग्रेस मनामनात अन् घराघरात' या उपक्रमातून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
महाविकास आघाडी करण्यासाठी विद्यमान नगरसेवक व पक्षातील ज्येष्ठ माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचाही अडथळा असणार आहे. त्यांना उमेदवारी देण्यासाठी दुसरा पक्ष तडजोड करणे अशक्य वाटू लागले आहे. तर कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत गेलेले आणि आता राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेले महेश कोठे यांच्यावर कॉंग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी नाराज आहेत.शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून जे उमेदवार इच्छुक आहेत, त्या प्रभागांमध्ये कॉंग्रेसचे प्राबल्य आहे. दिलीप कोल्हे, मनोहर सपाटे, पद्माकर काळे यांच्याविरोधात मागील निवडणुकीत देवेंद्र कोठे, मंदाकिनी पवार, अमोल शिंदे यांनी बाजी मारली. आता आघाडी झाल्यास त्याठिकाणी कोणाला उमेदवारी द्यायची, असा पेच अनेक प्रभागांमध्ये निर्माण होणार आहे. त्यामुळे आम्ही भाजपच्या अपयशावर नागरिकांसमोर स्वबळावर जाऊ, अशी भूमिका वाले यांनी मांडली. प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी यापूर्वीच त्यांची भूमिका स्पष्ट केल्याने आता माघार नाही, असेही वाले म्हणाले.
तीनही पक्षांच्या उमेदवारी वाटपाचा तिढा सुटणार नाही, याची खात्री आहे. अनेकजण कॉंग्रेसकडून इच्छुक असून शहरातील बहुतेक प्रभागांमध्ये कॉंग्रसेची ताकद मोठी आहे. त्यामुळे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका निवडणुकीत कॉंग्रेस स्वबळावर लढेल. तसा निर्णय प्रदेशाध्यक्षांना कळविला आहे, असे शहाराध्यक्ष प्रकाश वाले यांनी सांगितले.
म्हणून कॉंग्रेसने घेतला स्वबळावर लढण्याचा निर्णय
► राष्ट्रवादीसह अन्य पक्षांबद्दल शहरातील नागरिकांची नाराजी
►आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉंग्रेस स्वबळावर लढण्यास सक्षम
►कॉंग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी दोनशेहून अधिक उमेदवार इच्छुक
► आघाडी झाल्यास सर्व इच्छुकांना निवडणूक लढविण्याची संधी मिळणार नाही
►उमेदवारी न मिळाल्यास इच्छुकांना विरोधकांकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता
►बहुतेक प्रभागांमध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे ज्येष्ठ, आजी-माजी नगरसेवकच आमने-सामने
म्हणून कॉंग्रेसने घेतला स्वबळावर लढण्याचा निर्णय
0 Comments