सोलापूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरांची गर्दी !
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांमुळे कोरोना वाढत असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली असून जिल्हा आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणातही जिल्ह्यात बोगस डॉक्टर आढळून आले आहेत . कोरोनाच्या काळात डॉक्टरांची गरज मोठया प्रमाणात भासत असतानाच अनेकांना नवनव्या डॉक्टरांची माहिती या कालावधीत झाली आहे .
बोगस डॉक्टरांचा विषय कायम चर्चेत राहिला असला तरी त्यांच्यावर अपेक्षित कारवाई होताना मात्र फारसे दिसत नाही , कोरोनाच्या कालावधीत खेडोपाडी अनेक डॉक्टर असल्याचे समोर येत राहिले आणि ते कोरोनावर चांगले उपचार करीत असल्याची चर्चाही सतत ऐकायला मिळत आहे . त्यात रुग्णालयात जाण्याची भीती आणि बेड उपलब्ध नसल्याने रुग्ण चौकशी न करता अथवा माहिती न घेता कोणत्याही डॉक्टरकडे उपचार घेत आहेत . आपण कोरोना बरा करीत असल्याचा दावा करणारे या काळात अनेकजण पुढे आले . बोगस डॉक्टरांचा विषय लोकांच्या चर्चेत कायम असताना आता जिल्हाधिकारी आणि जिल्हा आरोग्य विभाग यांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे .
सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यात दहा दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे पण अद्याप कोरोना रुग्ण वाढीवर नियंत्रण आलेले दिसत नाही . संचारबंदीची अंमलबजावणी कडक नसल्याने ती कागदावरच असल्याचे दिसत आहे . कडक उपाय योजना करूनही कोरोनाचा संसर्ग कमी होत नसल्याने अभ्यास केला असता बोगस डॉक्टरांच्या मुळे संसर्गात वाढ होत असल्याचे दिसून आले आहे . रुग्ण अशा बोगस डॉक्टरांकडे जातात आणि आजार बळावल्यावर हे लक्षात येते . बोगस डॉक्टरांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी जिल्हा परिषद आरोग्य विभागाची आहे पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यानेच कोरोना वाढत आहे अशी माहितीही जिल्हाधिकारी यांनी दिली आहे . जिल्हा आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात २५० बोगस डॉक्टर असल्याचे यापूर्वीच आढळून आले आहे .
यातील ५४ डॉक्टरांवर गुन्हे दाखल केले सल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . शीतलकुमार जाधव यांनी दिली आहे . यातील फक्त एका डॉक्टरवर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे . बोगस डॉक्टरांच्या मुसक्या आवळणे नितांत गरजेचे झाले असून प्रशासनाने ही मोहीम हाती घेण्याची मागणी होत आहे .
0 Comments