भाई गणपतराव देशमुख यांची प्रकृती स्थिर, सोलापूरात उपचार सुरू -
सोलापूर (विशेष प्रतिनिधी) : सांगोला तालुक्याचे माजी आमदार तथा शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. गणपतराव देशमुख यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर सोलापूरातील अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू असून पित्ताशयाचे ऑपरेशन करण्यात आले आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी भेटण्यासाठी येऊन गर्दी करू नये. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आबासाहेब लवकर बरे होतील, असा विश्वास भाई गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केला आहेदरम्यान, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अश्विनी हॉस्पिटल सोलापूर येथे महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी भेट दिली. प्रकृतीची विचारपूस केली. त्यांनी डॉक्टरांशीही चर्चा केली. यावेळी हॉस्पिटलमध्ये भाई गणपतराव देशमुख यांचे ज्येष्ठ चिरंजीव पोपटराव देशमुख आणि अश्विनी हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.राष्ट्रवादीचे नेते ना. जयंत पाटील व दीपकआबा साळुंखे-पाटील यांनी रुग्णालयात जावून तब्येतीची विचारपूस केलीआबासाहेबांसोबत सदिच्छा असुद्या, आपल्या आशीर्वादाने आबासाहेब लवकर बरे होतील : डॉ. बाबासाहेब देशमुख माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सोशल मीडियाद्वारे संदेश जारी करून कार्यकर्त्यांना धीर धरण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी संदेशात म्हटले आहे की, “सोलापूर जिल्ह्यातील व विशेषत: सांगोला तालुक्यातील सर्व जनतेला सांगू इच्छितो की, सांगोला तालुक्याचे लोकप्रिय नेते भाई गणपतरावजी देशमुख ऊर्फ आबासाहेब यांना शुक्रवार, १६/७/२०२१ रोजी सोलापूर येथे अश्विनी हाॅस्पिटल येथे दाखल करण्यात आले. तेथे त्यांचे पित्ताशयाचे ऑपरेशन करण्यात आले असून सद्यस्थितीत त्यांची प्रकृती स्थिर असून कोणीही चिंता करु नये. तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. दवाखान्यातील फोटो पाहून आपण चिंता करु नये. अनेक जिल्ह्यातील व राज्यातील सर्व नेत्यांनी भेटून व फोनवरून तब्बेतीची विचारपूस केलेली आहे. आपण आबासाहेबांना दैवत मानता. त्यामुळे तुमच्या आशीर्वादाने सर्व काही ठिक होईल. कृपया आपली इच्छा असूनही भेटण्यासाठी आपण येऊ नये ही विनंती. आपला विश्वासू – डॉ. बाबासाहेब देशमुख.
0 Comments