नगरपरिषद हद्दीमधील दिव्यांगांना लवकरच आर्थिक सहाय्य मिळणार ः नगराध्यक्षा सौ. राणीताई माने
सांगोला/प्रतिनिधी ःशासननिर्णयानुसार नगरपरिषद क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींना दारिद्रय निर्मूलन अंतर्गत किमान 5 टक्के निधी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. यानुसार कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसार व प्रादुर्भावामुळे आर्थिक सहाय्य मिळण्याबाबत दिव्यांग व्यक्तींच्या वतीने लेखी निवेदन प्राप्त झाले होते.
त्यानुसार दिव्यांग व्यक्तींना उदरनिर्वाह अथवा व्यवसाय साहित्य खरेदी करणेकामी निधी देण्याची तरतूद आहे. त्यानुसार सांगोले नगरपरिषद हद्दीमधील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना उदरनिर्वाहाकरिता प्रति लाभार्थी 6000 रू. आर्थिक सहाय्य त्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा करण्यात येणार असल्याची माहिती लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांनी दिली.त्याचबरोबर सांगोले नगरपरिषद हद्दीमधील पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना शासनाद्वारे पुरस्कृत प्रधानमंत्री सुरक्षा योजना व प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना या विमा योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये (अपघाती विमा) 18 ते 70 वयोगटातील लाभार्थीचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसदाराला 2 लाख रु. अर्थसहाय्य, लाभार्थीला अपघातामुळे पूर्ण अपंगत्व आल्यास 2 लाख रु. अर्थसहाय्य, लाभार्थीला अपघातामुळे अंशिक अपंगत्व आल्यास 1 लाख रु. अर्थसहाय्य तसेच प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेमध्ये 18 ते 50 वयोगटातील लाभार्थ्याचा कोणत्याही प्रकारे (नैसर्गिक अथवा अपघाती) मृत्यू झाल्यास वारसदाराला 2 लाख रु. अर्थसहाय्य मिळणार असून त्यांच्या कुटूंबियांना आर्थिक संरक्षण प्राप्त करून देण्याच्या हेतूने न. पा. फंडातून पात्र दिव्यांग लाभार्थ्यांचा प्रत्येकी 342 रूपयांचा विमा उतरविण्यात येणार असल्याची माहितीही नगराध्यक्षा सौ. राणीताई माने यांनी दिली.तसेच सांगोले नगरपरिषद हद्दीमधील अजूनही या दिव्यांगाच्या लाभापासून वंचित असणार्या नागरिकांनी त्यांच्या कागदपत्रांसह नगरपरिषदेमधील सहाय्यक कर अधिकारी स्वप्निल हाके यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही यावेळी उपनगराध्यक्ष प्रशांत धनवजीर यांनी केले आहे.
0 Comments