एरोली: निवृत्त पोलिसाच्या गोळीबारात एका मुलाचा मृत्यू
नवी मुंबई: ऐरोलीतील एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने काल आपल्याच दोन मुलांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याने दोन्ही मुलांना घरी बोलवून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात ३३ वर्षीय विजयचा मृत्यू झाला आहे, तर त्याचा लहान भाऊ सुजय (३१) जखमी झाला आहे. विजयला तीन गोळ्या लागल्या होत्या. दोन पोटात आणि एक दंडावर गोळी लागली होती. रात्री रुग्णालयात उपचार सुरु असताना विजयचा मृत्यू झाला.भगवान पाटील (७४) असे आरोपीचे नाव आहे. ते निवृत्त सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे. रबाळे पोलिसांनी भगवान पाटील यांना अटक केली आहे. कार इन्शुरन्सचे पैसे भरण्याच्या वादातून भगवान पाटील यांनी आपल्या दोन मुलांवर गोळ्या झाडल्या. आयपीसी सेक्शनच्या हत्या आणि हत्येचा प्रयत्न या कलमांखाली भगवान पाटील यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.गोळीबार केला त्यावेळी भगवान पाटील नशेत असावेत असा पोलिसांना संशय आहे, पोलिसांनी त्यांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. ऐरोली सेक्टर ३ मध्ये संध्याकाळी ६.३० च्या सुमारास ही घटना घडली. विजय वसईला राहतो. त्याला गाडीचा हप्ता भरण्यासाठी इन्शुरन्स कंपनीकडून फोन आला. त्याने वडिल भगवान पाटील यांना फोन केला. त्यावेळी दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली असे पोलिसांनी सांगितले.पाटील यांनी दोन्ही मुलांना घरी बोलवून घेतले. मुले घरी पोहोचल्यानंतर पुन्हा वादावादी सुरु झाली. संतापाच्या भरात भगवान पाटील यांनी आपल्याच दोन मुलांवर गोळ्या झाडल्या. कौटुंबिक वादामुळे दोन्ही भाऊ स्वतंत्र राहत होते.
0 Comments