सांगोला ( विषेश प्रतिनिधी ) ; सांगोला शहरातील व तालुक्यात चालणाऱ्या अवैध धंद्यासह बेकायदेशीर सावकारी , बनावट दारू, गुटखा, मटका,वाळू चोरीवर तात्काळ कडक कारवाई करावी , जे बीट अंमलदार कारवाई करण्यास टाळाटाळ करतील त्यांची तात्काळ बदली करा. तरीही ते ऐकत नसतील तर तसा अहवाल पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे पाठवून द्या,मात्र कोणालाही पाठीशी घालू नका, अवैध धंद्याला थारा देऊ नका. अवैध धंद्यावर कारवाई करून मोक्का तडीपारीचे प्रस्ताव पाठवावेत.अवैध धंदेवाल्यांशी पोलिसांचा संपर्क असल्याचे आढळून आल्यास बडतर्फीची कारवाई करणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिला आहे. पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा पोट निवडणुकीच्या निमित्ताने पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी शुक्रवारी मंगळवेढा पोलीस स्टेशनला भेट देऊन अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना निवडणूकीविषयी महत्त्वाच्या सूचना केल्या .
त्यानंतर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सायंकाळी उशिरा सांगोला पोलीस स्टेशनला भेट देवून पोलीस अधिकारी कर्मचार्यांच्या अडी-अडचणी जाणून घेऊन दप्तर तपासणी केली . यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील ,पोलिस निरीक्षक भगवानराव निंबाळकर , पोलिस अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते . यावेळी पत्रकारांशी बोलताना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते म्हणाल्या , सांगोला तालुक्यात मटका , जुगार , वाळू चोरी , बनावट दारू , खासगी सावकारी अशा अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना दिल्या आहेत . अवैध धंद्यावर दररोज कारवाई करून मोक्का , तडीपारीचे प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयास सादर करावेत . गुटखा , मटका , बनावट दारू अशा अवैध धंद्यातील मुख्य गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी . खाजगीसावकारांच्या घरावर छापे टाकावेत . अनेक गुन्हे दाखल असलेल्या अवैध धंदेवाल्याचे तडीपारीचे प्रस्ताव कार्यालयाकडे पाठवून द्यावेत , जे पोलिस कर्मचारी अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची तात्काळ बदली करावी . त्यातूनही ते ऐकत नसतील तर तसा अहवाल कार्यालयाकडे पाठवावा अशा सूचना पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांना दिल्या आहेत . अवैध धंदेवाल्यांशी पोलिसांचा संपर्क असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिला .


0 Comments