महाराष्ट्रात गेले काही दिवस राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे . या पार्श्वभूमीवर राज्यात दिवसा जमावबंदी , रात्री नाईट कर्फ्यु आणि शनिवार रविवारी वीकेंड लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला आहे . पण तरीदेखील कोरोनाबाधितांचा आकडा कमी होताना दिसत नाही . त्यामुळे निरपराध लोकांचा जीव वाचवण्यासाठी किमान तीन आठवड्यांचा कडक लॉकडाउन लावण्याशिवाय पर्याय नाही , असे स्पष्ट मत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी टीव्हीनाइनशी बोलताना व्यक्त केले .
राज्यातील कोरोनाची स्थिती पाहता काही दिवसांत रूग्णांवर उपचार करायला आरोग्यसेवक कमी पडतील . याचा वेळीच विचार करून तीन आठवड्याचा कडक लॉकडाउन करावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचेही त्यांनी सांगितले " राज्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर चालली आहे . कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे . पण कोणत्याच प्रयत्नांना यश येत नाही . त्यामुळे लोकांचे जीव वाचवण्यासाठी तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन गरजेचा आहे . केंद्र सरकार महाराष्ट्राला चुकीची वागणूक देत आहे . लसींचा तुटवडा असूनही महाराष्ट्राला पुरवठा कमी केला जातोय . अशा परिस्थितीत लॉकडाऊन गरजेचा आहे . तसेच मुंबईतील लोकल ट्रेनच्या प्रवासावरही पुन्हा एकदा निर्बंध आणण्याचा विचार सुरू आहे " , असे वडेट्टीवार म्हणाले ." आगामी 10 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा हा 10 लाखांपर्यंत पोहोचू शकतो . सध्या भाजपकडून व्यापाऱ्यांना आंदोलन करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातंय . परिस्थिती लक्षात घेता विरोधकांनी यावरुन राजकारण न करता आम्हाला उपाय सुचवावेत . गुजरातमध्ये अनेक जिल्ह्यांत कडक लॉकडाऊन आहे . पण महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला तरच भाजपचे नेते टीका करतात " , अशी टीका त्यांनी केली .
0 Comments