महाराष्ट्रात या तीन भागात हवामान विभागाचा येत्या २४ तासात मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याचा अंदाज !
महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील अनेक भागात अंशत: ढगाळ वातावरण राहणार असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची (Rain Update Today) शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रासह कोकणातही गुरूवारपर्यंत ही स्थिती कायम राहणार असून अनेक ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वाऱ्यासह पाऊस होणार असल्याने नागरिकांनी झाडांपासून दूर राहावं, अशी सूचनाही देण्यात आली आहे. विदर्भ व परिसर आणि मध्यप्रदेश या भागात चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीवर आहे. तर कर्नाटकाची किनारपट्टी ते मराठवाडा, कर्नाटक, दक्षिण मध्य महाराष्ट्र या भागात कमी दाबाचे क्षेत्र आहे.ही स्थिती समुद्रसपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर आहे. तसंच राजस्थानचा नैऋत्य भाग ते अरबी समुद्राचा ईशान्य भाग, सौराष्ट्र आणि कच्छ या भागात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.दरम्यान, शनिवारीही महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले. अनेक ठिकाणी गारांचाही वर्षाव झाला. या पावसामुळे पीक काढणीला आलेलं असतानाच शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले. गहू, कांदा या पिकांचं मोठं नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा कंबरडं मोडलं आणि बळीराजा हवालदिल झाला.
0 Comments