खळबळजनक...अनैसर्गिक संबंधांना विरोध; मित्रांकडून तरुणाचा खून सांगली जिल्ह्यातील घटना
मिरज : माणुसकीला काळिमा फासणारी आणि समाजाला हादरवून टाकणारी घटना सांगली जिल्ह्यातील आरग (ता. मिरज) येथे उघडकीस आली आहे.
सुजल बाजीराव पाटील (वय २१, रा. आरग) या तरुणाचा त्याच्याच दोघा मित्रांनी अनैसर्गिक संबंधांना विरोध केल्याच्या कारणावरून पाण्यात बुडवून खून केला.
ही घटना आरग ते बेळंकी रस्त्यावरील गावतलावाशेजारील मंदिरात शनिवारी रात्री घडली. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी दोघा अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सुजल हा आई व नातेवाइकांसोबत एसटी स्थानक परिसरात राहत होता. मिळेल ते काम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.
शनिवारी सुजल आपल्या मजुरी करणाऱ्या दोन मित्रांसोबत जेवणासाठी बेळंकी येथे गेला होता. तेथे तिघांनी मद्यप्राशन केले. त्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास तिघेही दुचाकीवरून आरगला परत येत होते.
आरग तलावाजवळ आल्यानंतर दुचाकीवर बसण्यावरून त्यांच्यात वाद झाला. तलावाशेजारी असलेल्या छोट्या मंदिरात ते थांबले. यावेळी एका संशयिताने मद्याच्या नशेत सुजलसोबत अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला.
सुजलने त्यास कडाडून विरोध केला. यामुळे संतप्त झालेल्या दोघांनी त्याला मारहाण केली आणि तलावात नेत पाण्यात बुडवून त्याचा खून केला. नंतर मृतदेह तलावात टाकून दोघेही घटनास्थळावरून फरार झाले.
पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तत्काळ तपास सुरू केला आणि दोघा अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. पुढील चौकशी सुरू आहे.
सुजलच्या मृत्यूमुळे त्याच्या आईवर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नातेवाइकांनी सुजलच्या मृत्यूची बातमी ऐकताच आक्रोश केला. या हृदयद्रावक घटनेमुळे आरग गावात आणि परिसरात शोककळा पसरली आहे.
0 Comments