दुर्दैवी घटना..२ चिमुकल्यांना घेऊन आईने घेतली ८० फूट खोल विहिरीत उडी!
उत्तर सोलापूर तालुक्यातील दुर्घटना; दोघांचे मृतदेह सापडले पण एकाचा मृतदेह शोधण्याचे काम सुरुच
मुलीच्या जन्मानंतर झालेली दोन्ही मुले गतिमंदच असल्याच्या चिंतेतून आईने त्या दोन्ही मुलांसह गावाजवळील ८० फूट खोल विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. वांगी (ता. उत्तर सोलापूर)
येथे बुधवारी (ता.१२) दुपारी बाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. चित्रा कविराज हाके (वय, २८), पृथ्वीराज हाके (वय, ७), स्वराज हाके (वय, दीड वर्षे) अशी मयतांची नावे आहेत.
मूळचे नान्नज येथील असलेले कविराज उर्फ दत्तात्रेय हाके काही वर्षांपूर्वीच कुटुंबासह सासरवाडीला वांगी येथे रहायला गेले होते.
त्यांना एक आठ वर्षाची मुलगी असून तिच्यानंतर मयत चित्रा यांना पृथ्वीराज व स्वराज अशी दोन मुले झाली. पृथ्वराज गतिमंद होता, पण दीड वर्षाचा स्वराज देखील गतिमंदच जन्मला.
त्यातून चित्रा यांना त्यांच्या भविष्याची चिंता सतावत होती आणि त्यातून त्या निराश होत्या. या चिंतेतून त्यांनी बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास मुलांसोबत जगाचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला. गावाजवळील विहिरीत त्यांनी मुलांसोबत उडी घेतली,
त्यावेळी विहिरीपासून काही अंतरावर शेळ्या चारणाऱ्या मुलीला विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज आला. त्यांनी विहिरीकडे धाव घेतली, मात्र विहिरीलगत दाट झाडी असल्याने विहिरीपर्यंत जायला त्यांना वेळ लागला.
विहिरीत डोकावून पाहिल्यावर तीन वर्षाचा स्वराज पाण्यावर तरंगताना दिसला. घटनेची माहिती वाऱ्यासारखी गावात पसरली आणि सर्वांनीच विहिरीकडे धाव घेतली. सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ कदम त्यांच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले.
मृतदेह शोधण्यासाठी सोलापूर शहरातून अग्निशामक दलाचे पथक बोलावण्यात आले. या पथकाच्या सहाय्याने सायंकाळी सहाच्या सुमारास चित्रा यांचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात यश आले. तत्पूर्वी, चिमुकल्या स्वराजचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता.
मात्र, पृथ्वीराजचा मृतदेह उशिरापर्यंत सापडला नव्हता. सहायक पोलिस निरीक्षक श्री. कदम यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक महेश घोडके, शहाजी कांबळे व पोलिस हवालदार महिंद्रकर, मिस्त्री हे रात्रभर घटनास्थळी होते.
उपचारावर पाच-सहा लाखांचा खर्च
हाके कुटुंब शेतकरी असून भागाबाई हाके या आपल्या दोन मुलासह वांगी येथे राहत होत्या. मोठ्या मुलाचा कविराजचा विवाह त्याच्या मामाच्याच मुलासोबत झाला होता. कविराज व चित्रा यांचा संसार सुखाने सुरु होता, त्यांना एक मुलगीही झाली होती.
त्यानंतर त्यांना पृथ्वीराज झाला पण तो गतिमंद जन्माला आला. त्याच्या उपचारासाठी पाच ते सहा लाखांखा खर्च झाला होता. त्यानंतर स्वराजही तसाच जन्मल्याने चित्रा यांनी टोकाचे पाऊल उचचले, अशी चर्चा गावात होती.
८० फूट खोल विहीर रिकामी; सीसीटीव्ही लावून मृतदेहाचा शोध
बुधवारी दुपारी साडेबारापासून त्या मृत तिघांचे मृतदेह शोधण्याचे कार्य सुरू होते. सुरवातीला स्वराजचा मृतदेह सापडला, त्यानंतर चित्रा यांचा मृतदेह सापडला.
पण, सात वर्षीय स्वराजचा मृतदेह रात्री बारा वाजेपर्यंत सापडला नव्हता. पोलिसांनी अख्खी ८० फूट विहीर रिकामी केली होती. अंधारात मृतदेह शोधण्यासाठी विहिरीत कॅमेरे सोडले होते.
0 Comments