धक्कादायक...मामाच्या गावी असताना अनर्थ, चार्जिंगला लावलेला मोबाईल कानाला लावताच स्फोट
मोबाईल बॅटरीचा स्फोट होऊन पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात काल सायंकाळच्या सुमारास घडली.
समर्थ परशुराम तायडे (वय पाच वर्ष रा.आमठाणा,ता.सिल्लोड) असे मृत मुलाचे नाव आहे. समर्थ हा मामाच्या घरी आला असता ही घटना घडली आहे.
सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथे राहणारे तायडे कुटुंबिय नातेवाईकाच्या तेराव्याच्या कार्यक्रमासाठी भोकरदन तालुक्यातील कुंभारी गावात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत पाच वर्षाचा चिमुकला समर्थदेखील होता.
दरम्यान, तेराव्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर तायडे कुटुंब काल सायंकाळच्या सुमारास आपल्या मूळ गावी आमठाणा येथे परतणार होते.
त्याचवेळी नातेवाईकांच्या मुलासोबत खेळत असताना चिमुकला समर्थ चार्जिंगला लावलेल्या मोबाईलजवळ गेला. समर्थने मोबाईल कानाला लावला. त्याच क्षणी भयानक स्फोट झाला. या स्फोटात समर्थच्या कानाला तसेच बोटाला गंभीर दुखापत झाली.
कुटुंबियांनी त्याला उपचारासाठी भोकरदन येथील शासकीय ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी समर्थला तपासून मृत घोषित केले.


0 Comments