google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक घटना...रक्ताने पत्र लिहून दोन तरुणांची पंढरपूर ते सातारा पायी यात्रा !

Breaking News

खळबळजनक घटना...रक्ताने पत्र लिहून दोन तरुणांची पंढरपूर ते सातारा पायी यात्रा !

खळबळजनक घटना...रक्ताने पत्र लिहून दोन तरुणांची पंढरपूर ते सातारा पायी यात्रा !


 आपल्या रक्ताने पत्र लिहून दोन मराठा तरुणांची पंढरपूर ते सातारा पायी यात्रा काढून छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. 

मराठा आरक्षण हा सद्याचा धगधगता विषय असून अजूनही राज्यात कुठे ना कुठे आत्महत्या होत आहेत,

 तरुण निराशेत आपले आयुष्य संपवताना दिसत आहेत. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे मात्र आत्मविश्वासाने आरक्षण मिळणार असल्याचे सांगत आहेत तर सरकारमधील मंत्री आणि राजकीय नेते वादग्रस्त विधाने करीत आहेत, 

त्यामुळे मराठा समाजात अधिक संताप आणि रोष व्यक्त होत आहे. आजही एका तरुणाने आपले जीवन संपवले असून, मराठा समाजात जन्माला आलो यात माझी काय चूक म्हणत त्याने आत्महत्या केली आहे. 

मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणार असल्याची अफवा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच सांगितले आहे त्यामुळे मराठा बांधव आणखीच अस्वस्थ झाला आहे. अशात पंढरपूर येथील दोन तरुण रक्ताने पत्र लिहून पायी चालत सातारा येथे पोहोचले आहेत. 

पंढरपूर येथील शहाजी दांडगे आणि ज्ञानेश्वर गुंड हे दोन मराठा युवक तब्बल १८० किलोमीटर पायी चालत गेले आणि त्यांनी सातारा येथे छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. मराठा आरक्षणासाठी त्यांनी आपल्या रक्ताने लिहिलेले पत्र देण्यासाठी ते पंढरपूर ते सातारा पायी चालत गेले.

 यावेळी उदयनराजे भोसले यांनी त्यांची भेट घेतली आणि दोन्ही तरुणांची आस्थेने चौकशी केली. मराठा तरुणांनी रक्ताने लिहिलेले पत्र पाहून आणि वाचून त्यांचेही मन हेलावले. यावेळी त्यांनी शासनावर जोरदार संतापही व्यक्त केला. 'कुणाचेही असले तरी रक्त हे किमती आहे,

 या युवकांनी रक्ताने पत्र लिहिले आहे, तिकडे मनोज जरांगे पाटील यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. आरक्षण देण्याचे सोडून सत्ताधारी राजकारण करीत बसले आहेत, राजकारण करू नाकाम आरक्षण द्या'  अशा भाषेत उदयनराजे भोसले यांनी सरकारला सुनावले आहे.  

न्याय मिळेल या आशेने प्रत्येक समाजातील घटक शासनाकडे पहात आहे पण काही लोकप्रतिनिधी वेगळीच भाषा करीत आहे, चिथावणीखोर भाषा वापरून 'तुम्हाला बघून घेतो' असे म्हणत आहेत, सरकारने आता मराठा आरक्षणावर श्वेतपत्रिका काढावी अन्यथा येणारी पिढी माफ करणार नाही,

  समाजातील सगळ्याच घटकांना न्याय मिळायला पाहिजे, कुणाचे आरक्षण काढून कुणाला द्यावे असे नाही पण जनगणना करून आरक्षण निश्चित केले पाहिजे असे देखील त्यांनी सरकारला सुनावले आहे.

Post a Comment

0 Comments