सोलापूरच्या दिशेकडून बारामतीकडे जाणारा हॅरीअर पोलिसांनी पाठलाग करून पकडला चौपन्न लाखांचा गांजा !
सोलापूरकडून बारामतीच्या दिशेने विक्रीसाठी निघालेला ५४ लाखांचा गांजा पाठलाग करून पकडण्यात इंदापूर पोलिसांना यश आले असून एकूण ८० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अलीकडे शेतकरी पिकांच्या आतल्या बाजूला गांजाची लागवड करतांना मोठ्या प्रमाणात आढळून येत असताना इंदापूर पोलीस आणि पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी एक मोठी संयुक्त कारवाई केली आहे. इंदापूर - बारामती मार्गावर असलेल्या केतकी निमगाव हद्दीत पोलिसांनी हा मोठा साठा पकडला आहे.
सोलापूरच्या दिशेकडून बारामतीकडे टाटा कंपनीच्या हॅरीअर चार चाकी वाहनातून हा गांजा विक्रीसाठी चालला होता. या कारमधून तब्बल २१८ किलो २०० ग्रॅम वजनाचा गांजा पोलिसांनी पकडला. याची किंमत ५४ लाख ५५ हजार असून तीन कारसह एकूण ८० लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
गांजा विक्रीसाठी जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यामुळे त्यांनी सरडेवाडी हद्दीत सापळा लावला होता. यावेळी एकामागून एक अशा तीन गाड्या संशयास्पद वाटल्या. या गाड्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्या थांबल्या नाहीत तर तशाच बारामती - पुणे या बाजूकडे निघून गेल्या. गाड्या न थांबल्याने पोलिसांचा संशय अधिकच बळावला आणि त्यांनी त्यांचा पाठलाग सुरु केला.
अखेर निमगाव केतकी गावाच्या हद्दीत सोनई दूध डेअरीच्या जवळ त्यांना पकडण्यात यश आले. वाहने ताब्यात घेवून त्यांची तपासणी सुरु केली असता हॅरीअर कार क्र. एम एच ४२ बी ई ४९२५ या वाहनात डिक्की आणि मधल्या सीटच्या खालच्या बाजूस चिकटपट्टीचे आवरण असलेले पॅकेट्स पोलिसांच्या निदर्शनास आले.
सदर वाहनात अमली पदार्थ असल्याची खात्री होताच ही वाहने ताब्यात घेण्यात आली, अमिर गुलाब मुलाणी (रा. मळद, ता. बारामती), प्रकाश राजेंद्र हळदे (वय ३७ वर्षे, बारामती. मुळ रा. मुखाई, एस टी स्टॅंड जवळ, ता. शिरूर, ) रोहन उर्फ फलेसिंग काशीनाथ जगताप (वय ३३ वर्षे,
बारामती. मुळ रा. पणदरे, ता. बारामती) व सुरज भगवान कोकरे (वय ३२ वर्षे पणदरे, ता. बारामती) खंडु अश्रु परखड (वय २१ वर्षे, रा. पावणे वाडी, ता. बारामती, मुळ रा. लोणीपारवड वस्ती, ता. जामखेड, जि. अहमदनगर) या पाच जणांना ताब्यात घेवून पुढील कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.
विशाखापट्टणम येथून विक्रीसाठी हा गांजा आणण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली असून एकूण २१८ किलो २०० ग्रॅम वजनाचा अमली पदार्थ आणि तीन चार चाकी वाहने असा ८० लख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. इंदापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण यांनी ही संयुक्त कारवाई केली आहे.


0 Comments