कर्नाटकातून सांगोला मार्गे पंढरपूरहून टेंभूर्णी कडे जाणारा ट्रक पंढरपूरमध्ये 45 लाखाचा गुटखा जप्त
पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई, 34 लाख 50 हजाराचा गुटखा तर 10 लाखाचा ट्रक जप्त
सोलापूर : कर्नाटकातून सांगोला मार्गे पंढरपूरहून टेंभूर्णीकडे ट्रक भरुन जाणारा प्रतिबंधित गुटखा पंढरपूर शहर पोलीसांनी सरगम चौकातील अहिल्या पूलाजवळ पकडला आहे.
या ट्रकमध्ये 27 लाख 60 हजार रुपये किंमतीची हिरा पान मसाल्याची 120 पोती, तर सुंगीधीत तंबाखुची 6 लाख 90 हजार रुपये किंमतीची 30 पोती आणि 10 लाख रुपये किंमतीचा ट्रक असा एकूण 44 लाख 50 हजाराचा मुद्देमाल पंढरपूर शहर पोलीसांनी पकडला आहे. तर एकजणाला ताब्यात घेतले असल्याची घटना शुक्रवार दि. 7 रोजी घडली आहे.
याबाबत पंढरपूर शहर पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, कर्नाटक राज्यातून सांगोला मार्गे पंढरपूरहून टेंभुर्णीकडे लाल रंगाच्या मालवाहतूक ट्रक (एम.एच. 09, सी. ए. 3630) मधून प्रतिबंधीत व विक्रीस मनाई असलेला गुटखा, तंबाखू घेवून जात होता. पंढरपूर शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि सी.व्ही. केंद्रे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून सरगम चौकातील रिलायन्स पेट्रोलपंपा जवळ आला असता पोलीसांनी ट्रकला थांबवून चालकाकडे विचारणा केली.
तेव्हा चालकाने प्रतिबंधीत असलेला हिरा पानसमाला व सुगंधीत तंबाखू ट्रकमध्ये असल्याचे सांगीतले. पोलीसांनी सदरचा मालट्रक चालकासह शहर पोलीस ठाण्यास आणला. अन्न व औषध प्रशासनाला याबाबत माहिती देवून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. दरम्यान, ट्रकभरुन गुटखा पकडण्यात आल्याने गुटखा माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक हिंमतराव जाधव, डिवायएसपी विक्रम कदम, पो.नि. अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेचे प्रभारी सपोनि सी.व्ही. केंद्रे, पोसई दत्तात्रय आसबे, सपोफौ राजेश गोसावी, सुरज हेंबाडे, शरद कदम, सचिन इंगळे, सुनील बनसोडे, राकेश लोहार, सचिन हेंबाडे, सुजित जाधव, समाधान माने व टिमने केली आहे.
0 Comments