पंढरपूर - टेंभुर्णी रस्त्यावर अपघात, पती-पत्नी जागीच ठार !
पंढरपूर : वाढदिवस साजरा करण्यासाठी लहानग्या नातवाला पंढरपूर येथून घेवून जाण्यासाठी आलेल्या पतीपत्नीचा अपघाती मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना पंढरपूर - टेंभुर्णी रस्त्यावर घडली.
गेल्या काही काळापासून अपघात हा नित्याचाच भाग बनला असून रस्ते रुंद आणि सिमेंट काँक्रीटचे बनविल्यापासून वाहनांचा वेग अमर्यादित झाला असून प्रत्येकालाच मोठी घाई झालेली आहे. आपल्या आणि इतरांच्या प्राणाची पर्वा न करता वाहने रस्त्यावर सुसाट वेगाने धावत आहेत. कुणाच्या तरी बेपर्वाईमुळे कुणाचा तरी प्राण जात आहे. किड्या मुंग्यासारखी माणसं मरत असतानाही त्याचे गांभीर्य कुणाला उरलेले नसल्याचे दिसत आहे. माणसाच्या आयुष्याचे मोल उरलेच नसल्याचे दिसत आहे. पंढरपूर - टेंभुर्णी रस्त्यावर पुन्हा असाच एक अपघात झाला असून या अपघातात पती पत्नी याना जागीच आपला प्राण गमवावा लागला आहे.
टेंभुर्णी येथील ५५ वर्षे वयाचे गोरख मारुती माने आणि त्याची पत्नी ताई गोरख माने (वय ४६) हे पंढरपूर येथे आले होते. त्यांचा २ वर्षे वयाचा नातू अनमोल शांतीलाल माने हा पंढरपूर येथे असतो. त्याचा वाढदिवस असल्याने त्याला घेऊन जाण्यासाठी माने कुटुंब टेंभुर्णी येथील एम एच ९/ बी ७२५४ या कारने पंढरपूर येथे आले होते. लाडक्या नातवाला घेऊन ते याच कारने पंढरपूर येथून टेंभुर्णीकडे निघाले असताना दगड अकोले येथे त्यांच्या कारला मोठा अपघात झाला. या अपघातात गोरख माने आणि त्यांची पत्नी ताई माने यांचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने दोन वर्षे वयाचा अनमोल या अपघातातून बचावला आहे.
माने यांची कार पंढरपूर- टेंभुर्णी रस्त्यावरील दगड अकोले बस थांब्याजवळ पोहोचली असता समोरून टेंभुर्णीकडून येत असलेल्या एका ट्रकने भरधाव वेगाने या कारला जोराची धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की कारमधील गोरख माने आणि त्यांची पत्नी ताई माने यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात होताच परिसरातील नागरिक धावून गेले पण तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता.
अनमोल बचावला !
काळाच्या मोठ्या संकटातून दोन वर्षे वयाचा अनमोल मात्र सुदैवाने या अपघातातून बचावला आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच या संकटाने त्याच्या आजी आजोबांचा प्राण घेतला आणि वाढदिवस साजरा करण्याची त्यांची इच्छा राहून गेली. अपघात झाला तेंव्हा अनमोलच्या पायाला मार लागला असून त्याच्यावर टेंभुर्णी येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.


0 Comments