google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर : पुरात जीव धोक्यात घालून केला अंत्यविधी ; अक्कलकोट तालुक्यातील घटना

Breaking News

सोलापूर : पुरात जीव धोक्यात घालून केला अंत्यविधी ; अक्कलकोट तालुक्यातील घटना

 सोलापूर : पुरात जीव धोक्यात घालून केला अंत्यविधी ; अक्कलकोट तालुक्यातील घटना

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : पितापूर ( ता. अक्कलकोट ) हे हरणा नदी काठावरील गाव. कुरनूर धरणाच्या बॅक वॉटरचा परिसर असल्याने पुराचा धोका अधिकच वाढला आहे. नदीवर पूल नसल्याने अनेक वर्षांपासून या गावाला वाहतुकीबरोबरच असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.अशात मंगळवारी ( दि.८) या पुरात जीव धोक्यात घालून अंत्यविधी उरकण्याची वेळ पितापूरकरांवर आली.


पितापूर येथील नूरअली साहेबअली भंडारी यांचे निधन झाले. अंत्यविधी करण्याचे ठिकाण हे नदीच्या पलीकडे. ठरलेल्या ठिकाणी अंत्यविधी करणे क्रमपात्र. मात्र नदीला महापूर आलेला. अशा स्थितीत अंत्यसंस्कार कसे करायचे? हा प्रश्न उभा ठाकलेला. त्यातूनही मार्ग काढत काही जणांनी निर्णय घेतला. नातेवाईक नदीच्या पलीकडे थांबले आणि पोहता येणार्‍यांवर अंत्ययात्रा पैलतीरी पोचून अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली.


व्यक्तीचा शेवटचा प्रवास चांगला व्हावा, या भावनेतून त्यांनी तयारी दर्शवली. मृतदेह पलीकडे नेणार, , हा मोठा प्रश्न हाेता. पाण्याचा प्रवाह मोठा आणि त्यात खांद्यावर तिरडी घेऊन जायचे कसे? त्यात पाण्याचा लोंढा जर आला तर त्यातून मार्ग काढून तीर गाठायचे कसे? या सगळ्या प्रश्नावर मात करण्यासाठी चक्क तिरडीवर बांधलेला मृतदेह बॅरलवर ठेवण्यात आला. बॅरेल महापुराच्या प्रवाहात ढकलत हरणा नदीच्या पलीकडे पोहोचवण्याचा प्रयत्न झाला. यावेळी पाण्याच्या प्रवाहाने त्या लोकांचे पाय उडू लागले. घसरूही लागले. तरीही त्‍यांनी प्रयत्‍नांची पराकाष्‍ठा करत मृतदेह नदीच्या पलीकडे पोहोचवला. हा सगळा प्रकार नदीच्या दुसऱ्या टोकाला थांबून पाहणाऱ्यांच्या हृदयाचे ठोके मात्र वाढवून गेले.


२५ वर्षांपासून मागणी अपूर्ण

पितापुरकरांना वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी गेल्या २५ वर्षांपासून लढा द्यावा लागत आहे. कोणत्याही लोकप्रतिनिधींनी याचा विचार केलेला नाही. यामुळे नागरिकांना पितापूरहून सोलापूरला येण्यासाठी हन्नूर आणि नन्हेगावमार्गे जावे लागत आहे. हा प्रवास धोकादायक तर आहेच. शिवाय जास्त अंतराचाही आहे. २५ वर्षापासून पुलाची मागणी पूर्ण होत नसल्याने नागरिक चक्क हतबल झाले आहेत. आजपर्यंत अक्कलकोट तालुक्याला गृहराज्यमंत्री, ग्रामविकास राजमंत्री ही पदे मिळाली आहेत. खासदार, आमदारांनी या घटनेकडे प्राधान्याने लक्ष देऊन ही समस्या सोडवावी, अशी मागणी नागरिकांमधून हाेत आहे.


Post a Comment

0 Comments